गर्भवतीवर बलात्कार प्रकरणी तिघे ताब्यात; पाच फरारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

तासगाव - आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर पतीला डांबून ठेवून आठ जणांनी बलात्कार केल्याची प्रकार ३१ जुलैला घडला. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे.

तासगाव - आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर पतीला डांबून ठेवून आठ जणांनी बलात्कार केल्याची प्रकार ३१ जुलैला घडला. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे.

आणखी संशयितांना शोधण्यासाठी तासगाव पोलिसांचे पथक सातारा जिल्ह्यात गेले आहे. सर्व संशयित येळावी (ता. तासगाव) आणि दहिवडी (जि. सातारा) आहेत. संबंधित महिलेने वैद्यकीय तपासणीस नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिलेचा हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यांना हॉटेलमध्ये काम करण्यासाठी कामगार जोडपे हवे होते. असे जोडपे तासगावात आहे, अशी माहिती या प्रकरणातील मुकुंद माने या तुरची फाटा येथे ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरने दिल्यावरून ही महिला पतीसह ३१ जुलैला सकाळी सहाच्या सुमारास तुरची फाटा येथे आली होती. तेथे त्यांची मुकुंद मानेशी भेट झाली. मानेबरोबर असलेल्या सागरला (रा. तुरची फाटा) या दोघांना मारा, असे सांगितल्यावर सागर याने महिला आणि तिच्या पतीला मारहाण केली. 

दरम्यान, त्याच ठिकाणी आणखी अज्ञात चौघे मोटारसायकलवरून आले. त्यांनी महिलेच्या पतीला कारमध्ये कोंडून घातले. महिलेला जबरदस्तीने ओढून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिच्याकडील तीन तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोन्याची साखळी आणि २० हजार रुपये रोख काढून घेऊन तिला आणि तिच्या पतीला दम देऊन सोडून दिले. 
पीडित महिलने माने, सागरसह जावेद खान (रा. दहिवडी) आणि विनोद शामराव गंजाम (मूळ रा. नागपूर, सध्या दहिवडी) या चौघांसह अन्य अज्ञात चौघे अशा आठ जणांविरोधात फिर्याद दिली आहे. 

या घटनेतील संशयित चौघेही हॉटेल व्यवसायाशी संबंधित असून त्यापैकी सागर तुरची फाटा येथील एका ढाब्याचा मालक आहे. माने तेथे वेटर आहे. जावेद आणि विनोद गोंदवले, दहिवडी परिसरातील हॉटेल ढाब्यांवर वेटर आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विविध ठिकाणी पोलिस पथके रवाना केली. पोलिसांनी मुकुंद माने आणि येथील सागर थोरात यांना ताब्यात घेतले. दहिवडी, गोंदवले परिसरात सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडीले यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवले होते. त्यांनी तेथून विनोद याला ताब्यात घेतले आहे.

वैद्यकीय तपासणीस नकार
दरम्यान, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी वसंतदादा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असता तिने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना नक्‍की कुठे घडली, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

महिला आयोगाकडून गंभीर दखल
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्याकडून कोणती कारवाई करण्यात आली, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे किंवा कसे, याबाबतचा सविस्तर अहवाल त्वरित आयोगाला देण्याचे आदेश रहाटकर यांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिले आहेत.

संबंधीत बातम्या - 

तासगाव तालुक्यात आठ महिन्याच्या गर्भवतीवर सामुहिक बलात्कार

Web Title: Sangli News rape incidence in Tasagon Taluka