स्पर्धा परिक्षेत भाषा किंवा माध्यम हा फॅक्‍टर दुय्यमच असतो - स्वागत पाटील

जयसिंग कुंभार
रविवार, 29 एप्रिल 2018

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४८६ वा रॅंक मिळवून सांगलीतील स्वागत राजकुमार पाटील यांनी यश प्राप्त केले. मिरज तालुक्‍यातील कसबे डिग्रजमधील  जिल्हा परिषद शाळा ते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीपर्यंतचा त्यांचा शैक्षणिक प्रवास आणि चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश प्राप्त केले आहे. ‘सकाळ’शी संवाद साधताना त्यांनी या वाटचालीबरोबरच या यशामागचे सूत्रही मांडले.

प्रश्‍नः मराठी माध्यमातून शिक्षण आणि ग्रामीण पार्श्‍वभूमी हा कधी अडसर वाटला ?
स्वागत ः या दोन्हींत जमेचे आणि तोट्याचे काही मुद्दे आहेत. आधी जमेबद्दल. प्राथमिक स्तरावरच कोणत्याही विषयाचा गाभा आकलन झाला पाहिजे. जो मातृभाषेतूनच अधिक स्पष्ट, सहज आणि नैसर्गिकरीत्या होतो. ग्रामीण भागातून येण्यामुळे बहुसंख्य भारतीय ज्या अडचणींना सामोरे जातात त्या वास्तवाशी तुम्ही लहाणपणापासूनच जोडले जाता. जसे भारतीय शेतीच्या समस्या पुस्तकातून समजून घेण्याआधी त्या गावातूनच मला समजत होत्या. 

प्रश्‍न ः आणि आता अडसर...?
स्वागत :  पहिली अडचण म्हणजे आज ज्या गतीने स्पर्धा वाढलीय, त्यासाठी सक्षम असा अभ्यासक्रम माझ्या काळात स्टेट बोर्डाचा नव्हता. ‘सीबीएसई’ बोर्डाच्या अभ्यासक्रमाच्या कोणत्याही इयत्तेची काठिण्य पातळी आपल्या तुलनेत किमान चार पाच इयत्ता पुढची असते. त्यामुळे उत्तरेतली हिंदी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ किमान काही इयत्ता आपल्या पुढची असते. आपल्याकडे इंग्रजी भाषेबाबतचा न्यूनगंड घेऊनच मुले शिकत असतात. मलाही तो जाणवत होता. डिग्रजच्या शाळेत सारेच शिक्षक चांगले होते. मात्र इंग्रजीकडे जे विशेष लक्ष हवे होते, ते तिथे नव्हते. सांगलीत शहा प्रशालेत आल्यानंतर खूपच फरक पडला. अर्थात माझे वडील प्राध्यापक असल्याने त्यांना माझ्यातील या उणिवांवर मात करण्यासाठी त्यांनी माझ्याभोवती सतत ते वातावरण ठेवता आले. इंग्रजी वृत्तपत्र वाचन किंवा सार्वजनिक कार्यक्रमाची उपलब्धता माझ्यासाठी सांगलीत अधिक झाली. डिग्रजच्या तुलनेत सांगलीत अधिक संधी विस्तारली. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील वातावरणाचाही मला खूप चांगला फायदा झाला. इथे प्रवेश मिळाल्याने मला आत्मविश्‍वास मिळाला. 

प्रश्‍न ः या परीक्षांमध्ये उत्तरेचा वरचष्मा राहण्यामागची कारणे?
स्वागत ः ‘युपीएससी’च्या क्‍लासेससाठी दिल्लीत गेल्यानंतर बिहार किंवा उत्तरेतील मुलांशी संवाद  साधताना तुलना करता मला काही मुद्दे वाटले ते इथे नोंदवतो. तिथे प्राथमिक स्तरापासूनच तिथली मुले आपले छंदही अधिक सहेतूकपणे करीत असतात. इंग्रजीवरील त्यांचे प्रभुत्वही प्राथमिक स्तरापासूनच चांगले असते. पदवी शिक्षण ‘आयआयटी’ किंवा ‘आयआयएम’  सारख्या संस्थांमधून झाले असेल तर येणारा आत्मविश्‍वास वेगळाच असतो.

प्रश्‍न ः परीक्षेच्या तयारीत क्‍लासेसचे महत्त्व कितपत आहे?
स्वागत ः क्‍लासेस या परीक्षांच्या तयारीचा एक टप्पा तुम्हाला नक्की गाठून देतात. मात्र आता डिजिटलचा जमाना आहे. तुमच्यासाठी अनेक संधी आता तळहातावर निर्माण झाल्या आहेत. तुमचे वाचन आणि पाहण्याच्या कक्षा तुम्ही विस्तारत नेल्या पाहिजेत. लोकांशी निगडित असे हे क्षेत्र आहे. त्यामुळे समाजातील विविध एनजीओ किंवा नेते, कार्यकर्ते यांच्या कामाशी तुमचा  आधीपासूनच परिचय असणे, संपर्क असणे गरजेचे  आहे. त्यांच्याशी तुम्हाला जोडून घेता आले पाहिजे. या साऱ्या तुमच्या तयारीचा विस्तार क्‍लासमध्ये होतो. यशाचा लास्ट मैल जोडण्याचे काम क्‍लास करतात.
  
प्रश्‍न ः युपीएससीत मराठी टक्का वाढण्यासाठी काय करायला हवे?
स्वागतः गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मुले यशस्वी होत आहेत. मात्र ते प्रमाण आणखी वाढले पाहिजे. तेवढी क्षमता आपल्याकडे आहे. शालेय अभ्यासक्रमात ‘सीबीएसई’च्या धर्तीवर बदल होत आहेत. प्राथमिक  आणि पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रवास हाच पाया आहे. तो समजून उमजून झाला पाहिजे. इंग्रजीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ते प्रयत्नाने शक्‍य होते. मात्र भाषा किंवा माध्यम हा फॅक्‍टर दुय्यमच आहे... हे आधी लक्षात घ्या. शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षांना यश मिळो अथवा न मिळो बहुसंख्य मुलांनी त्या परीक्षा दिल्या पाहिजेत. शालेय स्तरावर खेळाचे महत्त्व खूप आहे. हरणं. अपयशाचा अनुभव खेळ देतात. त्यातून जिंकण्याची ऊर्मी देतात. ही परीक्षा संयमाची आहे. तो संयम खेळातून मिळतो. जिंकण्याचे स्पिरीट खेळ देतात. या परीक्षेसाठी  तो महत्त्वाचा भाग आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Swagat Patil interview