आता 2019 ला शासनाचे प्रगतीपुस्तक भरणार; शिक्षकांचा इशारा

Sangli
Sangli

सांगली : शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणविरोधी धोरणाबद्दल सतत निघणारे शासन अध्यादेश..शुद्धीपत्रके..ऑनलाईन कामांना जुंपणे..बदल्यांमधील गोंधळ अशा अनेक गोष्टींचा संताप आणि असंतोष आजच्या प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या धरणे आंदोलनात दिसला. आता सर्व बस्स..झाले. जेव्हा-जेव्हा शिक्षकांवर अन्याय होतो; तेव्हा सरकारला घरी बसावे लागतो या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा इशारा देत शिक्षकांना छळणाऱ्या शासनाचे प्रगस्तीपुस्तक 2019 च्या निवडणुकीत भरले जाईल असा निर्धार केला. 

राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न शासनाने न सोडवल्यामुळे सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन आज संपूर्ण राज्यात निदर्शने, मोर्चा व धरणे आंदोलन काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सांगलीतील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळपासून भर उन्हात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारहून अधिक शिक्षक-शिक्षिका एकवटले. दुपारी 12 पासून तीनपर्यंत धरणे आंदोलन केले. 
शिक्षक नेते, माजी आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, ""शिक्षकांवरील अन्यायाच्या विरोधात चारीबाजूनी शिक्षक येथे एकवटले आहेत. जिव्हाळ्याचे प्रश्‍न असल्यामुळे एकी दिसत आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. बदल्या सोयीच्या झाल्या पाहिजेत. जुने बदली धोरण स्विकारले पाहिजे. सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे. एमएस-सीआयटी कोर्सला मुदतवाढ द्यावी. ऑनलाईन माहिती भरण्यात शिक्षकांचा वेळ जातो, त्यामुळे ते बंद करा. सरकारने या मागण्याबाबत निर्णय घेतला नाहीतर संपूर्ण राज्यातून लाखोंचा विराट मोर्चा मुंबईत काढला जाईल. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरही मोर्चा काढला जाईल. शिक्षकांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न आहे. अन्याय दूर करायचा असेल तर प्रत्येकाने रस्त्यावर उतरले पाहिजे.'' 
समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड म्हणाले, ""आजच्या आंदोलनात एकत्र आलेले शिक्षक म्हणजे सरकारला एकप्रकारे इशाराच आहे. ही उपस्थिती म्हणजे एक चुणूक आहे. शिक्षक आणि शिक्षणविरोधी धोरण स्विकारणाऱ्या शासनाच्याविरोधात एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. आता पुढील काळात कुटुंबासह आंदोलन करावे लागेल. तरच सरकारला जाग येईल.'' 

माजी आमदार भगवानराव सूर्यवंशी, सयाजीराव पाटील, विनायक शिंदे, मुकूंद सूर्यवंशी, ज्ञानदेव भोसले, अमोल शिंदे, संतोष कदम, मुश्‍ताक पटेल, मारूती शिरतोडे, महेश शरनाथे, भानुदास चव्हाण, प्रमोद काकडे, जीवन सावंत, किरण गायकवाड, विजयकुमार कांबळे, जयश्री घाटगे, अंजली कमाने आदींची भाषणे झाली. आंदोलनात हंबीरराव पवार, सुनिता पाटील, मंदाकिनी भोसले, अनिल मोहिते, कृष्णा पोळ, अविनाश गुरव आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होते. 

दरम्यान संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. वरिष्ठ व निवड श्रेणीचे 23 ऑक्‍टोबरचे परिपत्रक रद्द करावी. ऑनलाईन कामे बंद करून डाटा ऑपरेटरची नियुक्ती करा. नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा. एमएस-सीआयटी प्रशिक्षणासाठी मुदतवाढ द्या. 27 फेब्रुवारीच्या बदलीच्या अध्यादेशात दुरूस्ती करून मे महिन्यात बदल्या करा अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या. 

आता माझी सटकली.. 
आंदोलनात सहभागी शिक्षकांनी विविध फलक घेतले होते. "आता माझी सटकली..युवा शक्ती एकवटली', "एकच मिशन..जुनी पेन्शन', "23 ऑक्‍टोबरचा तुघलकी आदेश रद्द करा', "27 फेब्रुवारीचा बदली आदेश रद्द करा' असे फलक लक्ष वेधून घेत होते. 

एकच मिशन..जुनी पेन्शन
जुनी पेन्शन हक्क संघटनेने आंदोलनात सहभागी शिक्षकांना पांढऱ्या टोप्या वाटप केल्या होत्या. टोप्यावरील "एकच मिशन..जुनी पेन्शन' ही घोषणा लक्ष वेधून घेत होती. शिक्षक-शिक्षिकांना भर उन्हात धरणे आंदोलन करताना या टोप्यांचा मोठा उपयोग झाला. 

शिक्षक संघटना एकत्र
आजच्या आंदोलनात राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, पदवीधर व केंद्रप्रमुख संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघ आदी संघटना एकत्र आल्याचे चित्र दिसले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com