महाराष्ट्राच्या राजकारणातील संत

सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी समाजहिताला प्राधान्य देत महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेण्याचे काम केले. मला ते महाराष्ट्राच्या राजकारणातील संत वाटतात. त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांच्या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील मुले वकील, डॉक्‍टर व इंजिनिअर झाली. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ हा मंत्र दिला.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी समाजहिताला प्राधान्य देत महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेण्याचे काम केले. मला ते महाराष्ट्राच्या राजकारणातील संत वाटतात. त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांच्या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील मुले वकील, डॉक्‍टर व इंजिनिअर झाली. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ हा मंत्र दिला. दादांचे हे दोन महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे ठरले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ते विश्‍वासू सहकारी होते. इंदिराजींच्या हत्येनंतर त्यांचा अस्थिकलश महाराष्ट्रात आणायचा होता. त्या वेळी दिल्लीत अनेक दिग्गज नेते असतानाही ‘अस्थिकलश सुशीलकुमारच महाराष्ट्रात घेऊन जातील,’ असे त्यांनी निक्षून सांगितले. तो कलश माझ्या हाती सोपवलाही. हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही. 

दादा आयुष्याच्या शेवटी-शेवटी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापुरातले त्यांचे कार्यक्रम झाले आणि ते इथेच आजारी पडले. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर मीच त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला घेऊन गेलो. तीन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अखेरच्या दिवसांतील त्यांची सोलापूरला झालेली भेट सर्वांनाच चटका लावून गेली. १९७७ मध्ये शरद पवार यांना पाठिंबा देत वसंतदादा आणि नासिकराव तिरपुडे यांचे संयुक्त सरकार पाडण्याच्या मोहिमेत मी सामील झालो. दादांचे मंत्रिमंडळ आम्ही खाली खेचले. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. बाबासाहेब भोसले यांच्यानंतर दादा १९८३ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांचे सरकार पाडण्यासाठी मी घेतलेली भूमिका पाहता, दादा मला मंत्रिमंडळात स्थान देतील, यावर माझ्यासह कोणाचाही विश्‍वास नव्हता. मात्र, दादांनी सर्वांचाच अंदाज चुकवत मला मंत्रिमंडळात स्थान दिले. इतकेच नव्हे, तर मी अर्थमंत्री व्हावे, असा आग्रह धरला व तो पूर्णत्वालाही नेला. पूर्वीचा राग न धरता सर्व काही विसरून त्यांनी मला मंत्रिमंडळात स्थान दिले, याचे मलाही आश्‍चर्य वाटले. त्यांनी मला बोलावून सांगितले, ‘‘सुशील, तू इंदिरा गांधींच्या विरोधात नव्हतास. तू तुझ्या मित्राच्या प्रेमापोटी त्यांच्याबरोबर गेलास. त्यामुळे तू या सरकारमध्ये आले पाहिजे.’’ असा मोकळ्या मनाचा, उदारमतवादी दिलदार नेता होणे नाही.

(शब्दांकन - विजयकुमार सोनवणे, सोलापूर)

Web Title: Sangli News Vasantdada Patil Birth centenary Festival