युवराज कामटेसह पाचजण बडतर्फ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

सांगली - अनिकेत कोथळे याचे कोठडीतील मृत्यूप्रकरण आणि त्याचा मृतदेह जाळल्याप्रकरणी उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे याला पोलिस दलातून अखेर बडतर्फ केले. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज हा आदेश जारी केला. त्यापाठोपाठ रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरूद्दीन मुल्ला या चौघांनाही बडतर्फ केल्याचा आदेश बजावला. 

सांगली - अनिकेत कोथळे याचे कोठडीतील मृत्यूप्रकरण आणि त्याचा मृतदेह जाळल्याप्रकरणी उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे याला पोलिस दलातून अखेर बडतर्फ केले. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज हा आदेश जारी केला. त्यापाठोपाठ रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरूद्दीन मुल्ला या चौघांनाही बडतर्फ केल्याचा आदेश बजावला. 

लूटमारप्रकरणी संशयित अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांना शहर पोलिसांनी अटक केली होती. चौकशीदरम्यान अनिकेतला "थर्ड डिग्री' वापरल्यामुळे त्याचा पोलिस ठाण्यातच मृत्यू झाला. सोमवारी (ता. सहा) रात्री हा प्रकार घडला. त्यानंतर कामटेने अनिकेत व अमोल पळाल्याचा बनाव केला. अनिकेतचा मृतदेह आंबोली येथे नेऊन अर्धवट जाळला. मृतदेह पुन्हा जाळून दरीत फेकून दिला. मंगळवारी सकाळपासून सांगली परिसरात खळबळ उडाली. नातेवाइकांनी घातपाताचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरवून कामटे व सहकाऱ्यांचा बनाव उघड केला. 

अनिकेतच्या पोलिस कोठडीत मारहाणीने मृत्यूप्रकरणी "एलसीबी'चे निरीक्षक राजन माने यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस, "सीआयडी'च्या प्राथमिक तपासाचा अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांना प्राप्त झाला आहे. कामटेने अनिकेतला पोलिस कोठडीतून बाहेर काढून "डीबी' रूममध्ये नेले. तेथे क्रूरपणे, अमानुष छळल्यानंतर अनिकेतचा मृत्यू झाला. गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून कामटेने ठाणे अंमलदाराकडे आरोपी पळाल्याची खोटी फिर्याद दिली. पोलिस ठाण्यातील "सीसीटीव्ही' फुटेज नष्ट केले.

मृत अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर अमोल भंडारेलादेखील "तुझीही याच पद्धतीने विल्हेवाट लावू,' अशी धमकी दिली, असे तपासात स्पष्ट झाले आहे. कामटेचे गुन्हेगारी कृत्य, नैतिक अध:पतनाचे वर्तन यांमुळे सामान्य नागरिकांत पोलिस दलाच्या कार्यपद्धतीबद्दल संशय निर्माण झाला आहे. नैराश्‍याची भावना व पोलिसांची बदनामी झाली. या सर्व बाबींचा विचार करून कामटेला आजपासून सेवेतून बडतर्फ करत असल्याचा आदेश श्री. नांगरे-पाटील यांनी जारी केला आहे. 

दरम्यान, या घटनेतील उपनिरीक्षक युवराज कामटेचे सहकारी पोलिस कर्मचारी अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरूद्दीन मुल्ला यांनाही बडतर्फ करण्यात आले. त्यांच्या बडतर्फीचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी आज काढले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Yuvraj Kamate suspend