सांगली : अहिल्यादेवी स्मारकाभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्यादेवी स्मारकाभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त

सांगली : अहिल्यादेवी स्मारकाभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त

कुपवाड : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून महापालिकेतील राष्ट्रवादी-काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये उफाळलेल्या जोरदार वादाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्मारक परिसरात कडक संचारबंदी लागू केली आहे. ‘त्या’ बंदोबस्तासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून पोलिसांनी हजेरी लावली आहे. कडेकोट बंदोबस्तात जागोजागी अडथळे उभे केले आहेत.

महापालिका प्रभाग समिती तीन अंतर्गत प्रभाग क्रमांक आठमधील रघुवंश कॉलनीतील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा येत्या २ एप्रिलला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. त्याबाबतचा कार्यक्रम महापौरांसह राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला. विषयावरून महापालिकेत श्रेयवाद उफाळला आहे. भाजपने त्याआधीच उद्या २७ मार्चला बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या हस्ते स्मारकाचे उद्‍घाटन करणार असल्याचे जाहीर केले.

यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोहळ्याचे नियोजनही केले. त्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी या परिसरात २ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच स्मारक परिसरातील संचार बंदीचे स्वरूप दिसू लागले. पोलिसांचा मोठा ताफा सकाळीच हजर झाला. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून जागोजागी अडथळे लावले आहेत. शंभर मीटर हद्दीतील सर्व रस्ते वाहतुकीस बंद केले आहेत. शासकीय वाहतुकीसाठी चेक पोस्ट पद्धतीने एखादाच मार्ग राखीव ठेवण्यात येणार आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

Web Title: Sangli Police Security Around Ahilya Devi Memorial

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..