सांगलीच्या पोलिसाची मुंबईत माणुसकी; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

मुळचे सांगलीचे मात्र नोकरीनिमित्त मुंबईत आकाश गायकवाड यांनी माणुसकी धर्म जागवत एका चिमुरडीला जीवदान देण्याचे अलौकिक काम केले आहे. मुंबईवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट घोंघावत असताना त्यांनी रक्‍तदान करुन जीव वाचवला आहे. 

सांगली : मुळचे सांगलीचे मात्र नोकरीनिमित्त मुंबईत आकाश गायकवाड यांनी माणुसकी धर्म जागवत एका चिमुरडीला जीवदान देण्याचे अलौकिक काम केले आहे. मुंबईवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट घोंघावत असताना त्यांनी रक्‍तदान करुन जीव वाचवला आहे. 

कुटुंबिय व अन्य नातेवाईक जवळ नसताना त्या चौदा वर्षीय मुलीची ओपन हार्ट सर्जरी श्री. गायकवाड यांच्या सहकार्याने झाली. खाकी वर्दीतील सांगलीच्या या सुपुत्राच्या कामगिरीची दखल खुद्द राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह मुंबई पोलिस आयुक्‍तांनीही घेतली आहे. 

आकाश गायकवाड सध्या मुंबईतील ताडदेव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. माळवाडी (ता. मिरज) येथील भूमिहीन शेतकरी व सांगली मार्केट यार्डात दिवाणजी म्हणून कार्यरत असणारे बाबासाहेब गायकवाड यांचे ते चिरंजीव. आई वडीलांनी प्रचंड कष्ट उपसत त्यांना शिकवले. प्राथमिक शिक्षण गावातील जि.प. शाळेत तर माध्यमिक शिक्षण माळवाडी येथील वीराचार्य बाबासाहेब कुचनूरे विद्यामंदिर येथे पूर्ण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ऍथलेटिक्‍स खेळाची आवड जोपासत सांगलीत केडब्ल्युसी महाविद्यालयात पदवी घेतली. राज्य स्पर्धेत त्यांनी दोनवेळा सुवर्णपदक मिळवत क्रीडाशिक्षक महावीर वाजे, अनिल ऐनापुरे व जिनेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऍथलेटिक्‍समध्ये भरारी घेतली. 2014 साली ते मुंबई पोलिस दलात खेळाडू कोट्यातून भरती झाले. 

बुधवारी ते माझगाव स्ट्रॉंग रुममध्ये कर्तव्यावर होते. मुंबईत निसर्ग चक्रीवादळाने हाहाकार उडाला असताना सर्व रस्ते बंद होते. चौदा वर्षाच्या सना फातिम खान हिचे नातेवाईक, कुटुंबिय चक्रीवादळात अडकून पडलेले असताना ते रुग्णालयात येणे अशक्‍य होते. त्यांच्या सहकारी पोलिसाला समुद्रालगतच असणाऱ्या हिंदुजा रुग्णालयात एका मुलीला ओपन हार्ट सर्जरीवेळी ए पॉझिटिव्ह रक्‍त पाहिजे असल्याचे समजले.

मित्राने आकाश यांना सांगितल्याक्षणी त्यांनी तातडीने दुपारी रुग्णालयात जाउन रक्‍तदान केले. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह सनदी अधिकारी तुकाराम मुंडे, पोलिस आयुक्‍त विश्‍वास नांगरे पाटील यांनी घेत त्यांचे कौतुक केले आहे. सेलिब्रिटींनी समाजमाध्यमांवर त्यांच्या या कार्याला सलाम केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli police's humanity in Mumbai; Appreciated by Chief Minister