सांगलीत नियम धाब्यावर; स्टॅम्प खरेदीसाठी रांगा 

जयसिंग कुंभार 
Wednesday, 22 July 2020

कोरोना, टाळेबंदी, मर्यादित स्टॉक अशा अनेक कारणांमुळे स्टॅम्प खरेदीसाठी गेल्या चार पाच दिवसांपासून रांगा लागल्या आहेत.

सांगली : कोरोना, टाळेबंदी, मर्यादित स्टॉक अशा अनेक कारणांमुळे स्टॅम्प खरेदीसाठी गेल्या चार पाच दिवसांपासून रांगा लागल्या आहेत. अगदी गुरुवारपासून महापालिका क्षेत्रात टाळेबंदी असूनही आजही या रांगा कायम होत्या. कोरोना संसर्गाची धास्तीखालीच नागरिक गर्दीत थांबले होते. 

गेल्या चार महिन्यांपासून कोरोना संसर्गाचे अनेक क्षेत्रावर दुष्परिणाम दिसून येत आहेत. नित्य अनेक शासकीय कामाचा भाग असलेल्या स्टॅम्पची टंचाई आता नेहमीची झाली आहे. कोरोनाची टाळेबंदी उठल्यानंतर स्टॅम्प साठा संपल्यानंतर कोषागार कार्यालयाने पुण्यातून स्टॅम्प मागवले मात्र त्याच्या नोंदी करून त्याचे वाटप मात्र अद्याप सुरु नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे जुना स्टॉक आहे त्यांच्याकडूनच विक्री सुरु आहे.

कोरोना संसर्गाबाबत ग्राहकांनी कोणती दक्षता घ्यावी याचे फलकच विक्रेत्यांनी लावले आहेत मात्र ग्राहकांकडून त्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे विक्रेते भयाच्या छायेखाली आहेत. संसर्गाचा धोका कमी व्हावा यासाठी कमीत कमी संपर्क व्हावा यासाठी विक्रेत्यांनी एक आड एक स्टॅम्प विक्रीचा परस्पर निर्णय घेतला आहे. त्यामुळेही एकाच दिवशी एकाकडे खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र गेल्या पंधरा दिवसात दिसत आहे. 

"" कोषागार कार्यालयाकडे अनेक विक्रेत्यांनी स्टॅम्पची मागणी नोंदवली आहे. कोरोना आपत्तीमुळे काही कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन व्हावे लागले तर अन्य कामांमुळे स्टॅम्पचे अनुक्रमांक नोंदवण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. विक्रेतेही भितीच्या छायेत असून रोजचा संपर्क टाळण्यासाठी सुटी घेऊन विक्री सुरु आहे. त्यामुळे टंचाईसदृष्य स्थिती आहे.'' 
- निनाद वैद्य, स्टॅम्प विक्रेते 

संपादन ः प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli rules on Dhaba; Queues for stamp purchases