esakal | बुद्धिबळ पंढरी सांगलीचा ऑनलाईन पटावरही ठसा; अनेक ठिकाणच्या स्पर्धांवर नियंत्रण; "इंडिया बुक'मध्येही नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli shines in online chess also; Control's  many competitions in country

लॉकडाउनच्या काळात एकमेव ऑनलाईन बुद्धिबळ खेळ जगभरात खेळला जात आहे. बुद्धिबळ पंढरी असा नावलौकिक मिळवलेल्या सांगलीचा ऑनलाईन बुद्धिबळ पटावर देखील ठसा उमटला आहे.

बुद्धिबळ पंढरी सांगलीचा ऑनलाईन पटावरही ठसा; अनेक ठिकाणच्या स्पर्धांवर नियंत्रण; "इंडिया बुक'मध्येही नोंद

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : लॉकडाउनच्या काळात एकमेव ऑनलाईन बुद्धिबळ खेळ जगभरात खेळला जात आहे. बुद्धिबळ पंढरी असा नावलौकिक मिळवलेल्या सांगलीचा ऑनलाईन बुद्धिबळ पटावर देखील ठसा उमटला आहे. सांगलीसह राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक स्पर्धा सांगलीतील खेळाडू, प्रशिक्षक व पंचाच्या मदतीने पार पाडल्या जात आहेत. मोफत ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा पार पाडण्याचे वेगळे आव्हान यानिमित्ताने पेलले आहे. 

मार्च महिन्यात कोरोना प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा झाली. अनेक गोष्टींबरोबर खेळांवर देखील बंधने आली. परंतु याचवेळी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा घेण्यास सुरवात झाली. त्यामुळे लॉकडाऊन काळात हा एकमेव खेळ ऑनलाईन पद्धतीने जगात खेळला गेला. बुद्धिबळ पंढरी असलेली सांगलीनगरी देखील यात आघाडीवर राहिली. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात सांगलीतून अनेक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा खेळल्या गेल्या. "वॉरियर्स का महायुद्ध' या स्पर्धेत तब्बल 2458 खेळाडू देशभरातून सहभागी झाल्यामुळे नवा विक्रम नोंदवला गेला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये त्याची नोंद झाली. 

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा पारदर्शकपणे पार पाडण्यात सांगलीतील प्रशिक्षक तथा खेळाडू श्रेयस पुरोहित आणि सहकाऱ्यांनी नावलौकिक मिळवला. त्यामुळे सांगलीतील पुरोहित चेस ऍकॅडमीच्यावतीने जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील अनेक ठिकाणच्या स्पर्धा पार पाडल्या जात आहेत. तसेच तमिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश आणि राजस्थानमधील ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा श्रेयस आणि टीमने आतापर्यंत पार पाडल्या आहेत. 20 हून अधिक स्पर्धा यशस्वी आयोजित करून ऑनलाईन बुद्धिबळ पटावर सांगलीचे नाव कोरले गेले आहे. कोरोनानंतरही ऑनलाईन बुद्धिबळ सुरूच राहणार असून, यानिमित्ताने सांगलीचा लौकिक जगभर कायम राहील. 

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या स्पर्धामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक देशांतील खेळाडू सहभागी होतात. प्रत्यक्षात समोरासमोर खेळताना नियंत्रण ठेवणे सोपे असते. परंतु ऑनलाईन खेळात प्रत्यक्ष खेळाडू खेळला की नाही याचा शोध स्पर्धा घेणाऱ्यांना घ्यावा लागतो. तो कशा पद्धतीने खेळला, कॉपी केली नाही ना? याची चिकित्सा करावी लागते. तसेच शंका आल्यानंतर खेळाडूची परीक्षा घ्यावी लागते. निकाल लावण्यासाठी 24 तास लागतात. खेळाडूने फसवेगिरी केली तर त्यावर "बॅन' आणावा लागतो.

त्यामुळे स्पर्धा घेण्यापासून त्याचा निकाल जाहीर करेपर्यंत पारदर्शकपणा ठेवण्यासाठी ऑनलाईन नियंत्रण ठेवणे ही कसरतच ठरते. तसेच स्पर्धेत जगभरातील ग्रॅंडमास्टर, आंतरराष्ट्रीयमास्टर, फिडेमास्टरसह मानांकित खेळाडूंना निमंत्रित करण्यासाठी देखील प्रोत्साहित करावे लागते. या सर्व गोष्टींमध्ये श्रेयस पुरोहित, सारंग पुरोहित, पंच शार्दुल तपासे, दीपक वायचळ यांनी कौशल्य आत्मसात केले आहे. 
 

व्हीडिओ कॉन्फरन्सचा वापर करण्याचा मानस

लॉकडाउनच्या काळात मोफत ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचा पॅटर्न निर्माण केला आहे. त्यामुळे पुरोहित चेस ऍकॅडमीच्यावतीने राज्यातील व बाहेरील स्पर्धा पार पाडल्या जातात. यानिमित्ताने मोफत ऑनलाईन स्पर्धेचे नवे व्यासपीठ निर्माण झाले आहे. स्पर्धांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी भविष्यात व्हीडिओ कॉन्फरन्सचा वापर करण्याचा मानस आहे. 
- श्रेयस पुरोहित, बुद्धिबळ प्रशिक्षक 

संपादन : युवराज यादव