
सांगलीसह जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; २० तास कोसळधारा
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी ‘ग्रॅंड एंट्री’ केलेल्या वळिवाने रात्री तळ ठोकला आणि आज दिवसभर धिंगाणा घातला. वळिवाने तब्बल वीस तास सलग धुवून काढले. पावसाने उन्हाळा वाहून गेलाच, शिवाय मे महिन्यातच ओढे भरून वाहायला लागले. सांगली शहरातील विस्तारीत भागात तळी साचली, दलदल झाली, चौकांचौकात पाणी साचले. बाजार कोलमडला. शासकीय व खासगी कार्यालयांतील व्यवहारांसह एकूणच जीवनमान विस्कळीत झाले. सोबतच, यंदाच्या पावसाळ्यात आणखी मोठे संकट येईल की काय, या भीतीने नदीकाठाला घाम फोडला. गुरुवार, शुक्रवार पाऊस पडणार हा अनुमान होताच, मात्र असा अजब पाऊस पडेल, अशी अपेक्षा नव्हती. मे महिन्यात वळीव येतोच, तास-दोन तास ढगांचा गडगडात होतो, विजा चमकतात, पाणी पाणी होते आणि तो निघून जातो. यावर्षी पावसाचा मूड वेगळा आहे. सलग दोन दिवस मुक्काम ठोकून तो कोसळत आहे. हस्त नक्षत्रात ज्या पद्धतीने तो तळ ठोकतो, तशीच अवस्था असल्याचे जुने जाणकार सांगत आहेत. मे महिन्यात वळवाचा पाऊस अशा पद्धतीने पडताना आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, ही ज्येष्ठांची प्रतिक्रिया बोलकी आहे.
सांगली अतिवृष्टीचे केंद्र?
सकाळ ॲग्रोवन वर्धापनदिन विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात तज्ज्ञांनी सांगली हे भविष्यातील अतिवृष्टीचे केंद्र असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज खरा ठरत असल्याचे चित्र कालपासून समोर येत आहे. जतमध्ये अतिवृष्टी, सांगली शहरांत मुसळधार व जिल्हाभर एकावेळी वळिवाची हजेरी, असे अजब रसायन पाहायला मिळाले.
५२ मिलीमीटर नोंद
जिल्ह्यात २४ तासांत ५२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस जत तालुक्यात नोंदवली गेला. तेथे ९३.४ मिलीमीटर पाऊस झाला. मिरज तालुक्यात ७१.४, खानापूर तालुक्यात ३८, वाळवा तालुक्यात ३३.५, तासगाव तालुक्यात ५५.६, शिराळा तालुक्यात २१.०४, आटपाडीत २४.८, कवठेमहांकाळ तालुक्यात ८६.९ तर पलूस तालुक्यात ४६.७ तर कडेगाव तालुक्यात १७.८ मिलमीटर पावसाची नोंद झाली आहे.
लग्नात तारांबळ :
आज लग्नाचा मुहूर्त होता. उन्हाळ्याची सुटी साधून लोकांनी तयारी केलेली. त्या साऱ्यांची पुरती तारांबळ उडाली. पाहुण्यांचे हाल झाले.
शामरावनगरची दैना ः
पावसाळ्यातील ‘हॉट डेस्टीनेशन’ असलेल्या शामरावनगरात वरुणराजाने दिलेल्या पहिल्या सलामीला पार दैना उडवून दिली. आधीच तुंबलेली गटारे आणि पालिकेच्या तथाकथित ड्रेनेज योजनेची कामे यामुळे रहिवाशांना जगणे नकोसे झाले. विश्वविजय चौक परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. देवेंद्र सोसायटीत तर रस्ते खाली आणि गटारे वर अशी स्थिती असल्याने काय स्थिती झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. महसूल कॉलनीत सध्या ड्रेनेजचे कामांसाठी प्रशासनाने पावसाळ्याचा मुहूर्त शोधला आहे. त्याचे परिणाम नागरिकांना पुरते भोगावे लागत आहेत.
महापालिकेचे नालेसफाईचे नाटक उघडे पडले आहे. आधी शामरावनगर परिसरात कामे सुरू करण्याऐवजी जिकडे पूर येत नाही अशा भागात सुरू आहेत. आज एक जेसीबी पाठवून प्रशासन आमची चेष्ठा करीत आहे. आयुक्तांनी शामरावनगरात एक फिरस्ती करावी.
- संदीप दळवी, सामाजिक कार्यकर्ते
Web Title: Sangli Twenty Hours Heavy Rain Water
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..