सांगली : पावसाळी हंगामात विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Virus

सांगली : पावसाळी हंगामात विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढले

सांगली : अनियमित पावसाळी हवेमुळे वातावरणातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. त्यामुळे विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढले असून फ्लू, डेंगीने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत; मात्र भिण्याचे कारण नसले तरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांत अनिश्चित हवामान झाले आहे. त्याचा परिणाम प्रकृतीवर होत आहे. सर्दी, खोकला, तापाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच डेंगीचीही साथ सुरू आहे. हे वातावरण साथीच्या रोगांना आमंत्रण देणारे असल्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे डॉक्टरांनी आवाहन केले आहे.

पावसाळी हंगामात विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे फ्लूची साथ पसरते. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढतात. अशक्तपणा येऊन काहीवेळा अन्न बेचव लागते. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. गेले काही दिवस शहरात फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दी वाढलेली आहे. याच हंगामात डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी होण्याचे प्रकार होतात.

त्यामुळेही मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येतो. प्लेटलेट्सची संख्या एक लाखापेक्षा कमी आल्यास रुग्णाला ॲडमिट होण्याचीही वेळ येते. गेल्या काही दिवसांत दररोज सरासरी २५ ते ३० रुग्ण नव्याने कोरोनाग्रस्त होत आहेत; पण पहिल्या दोन लाटेप्रमाणे सध्याची स्थिती नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आढळत नाही. आजअखेर १९५ रुग्ण उपचार घेत आहेत, मात्र यापैकी केवळ ३५ जण रुग्णालयांत उपचार घेत आहेत, तर १६० जण घरीच राहून उपचार घेत आहेत.

स्वाईन फ्लूची साथ नाही

दरम्यान, या विषाणू संसर्गामध्येच होणारा आणखी एक आजार म्हणजे स्वाइन फ्लू, मात्र यंदा स्वाईन फ्लूचे रुग्ण नसल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी सांगितले. एकच रुग्ण काही दिवसांपूर्वी आढळला होता. तो ग्रामीण भागातील होता. शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण नसल्याचे त्यांनी सांगितले.

विश्रांती गरजेचीच

सध्याच्या पावसाळी हवामानात विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो सर्दी, खोकला, ताप असे फ्लूचे आजार होतात. साधारणपणे सगळ्या विषाणू संसर्गात ही लक्षणे दिसतात. यावर उपचार घेतले तरी विश्रांती ही महत्त्वाची आहे. त्यामुळे या आजारांमध्ये ‘रेस्ट इज बेस्ट’ हा उपाय चांगला ठरतो, असे डॉ. बिंदुसार पलंगे यांनी सांगितले.

Web Title: Sangli Virus Infection Increased During The Rainy Season

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..