
दक्षिणेत तमिळनाडूसह किनारपट्टीला वादळी वारे बडवत असताना त्याचे पडसाद जिल्ह्यात गेले काही दिवस उमटत आहेत.
सांगली ः गेल्या आठ दिवसात पुर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याने जिल्हाभरात चिकणगुण्या सदृष्य तापाच्या साथीने सारे बेजार झाले आहेत. घरटी असे रुग्ण दिसत आहेत. कोरोनाच्या भितीने ग्रासलेल्या स्थितीत हे नवे संकट आहे. घराबाहेर पडणारी लहान मुले आणि तरुणांचा प्रामुख्याने रुग्णांमध्ये समावेश आहे.
दक्षिणेत तमिळनाडूसह किनारपट्टीला वादळी वारे बडवत असताना त्याचे पडसाद जिल्ह्यात गेले काही दिवस उमटत आहेत. दिवसभर दमट हवा, पुर्वेकडून वाहणारे वारे, रात्री उशिरानंतर पडणारी थंडी यामुळे सारे बेजार आहेत. हवामानातील हा अचानक बदल मात्र अनेकांना त्रासदायक ठरतो आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कमी झालेली दवाखान्यांमधील गर्दी आता पुन्हा वाढत आहे. डेंगी, चिकणगुण्या, हिवतापाचे रुग्ण आहेत. प्रत्येकामध्ये लक्षणे वेगवेगळी आढळत आहेत. लक्षणे चिकणगुण्याची असली तरी प्रयोगशाळेतील चाचणी मात्र निगेटीव्ह येते असेही डॉक्टरांचे निरिक्षण आहे.
दरम्यान महापालिकेची यंत्रणाही वाढत्या प्रादुर्भावामुळे अलर्ट झाली आहे. या आजारांवर नियंत्रणासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चारुदत्त शहा म्हणाले,"" पालिकेचे 25 ब्रिडिंग चेकर्स 20 प्रभागामध्ये काम करीत आहेत. दैनंदिन गृहभेटी, सर्वेक्षणाद्वारे डासअळी शोधणे हंगामी व कायमस्वरूपी डासउत्पत्ती होणाऱ्या जागा यांची गणना सदर ही मंडळी करीत आहेत. साचलेल्या पाण्यांमध्ये गप्पी मासे सोडणे, आळी नाशकाची फवारणी करणे व जनप्रबोधनाचे काम सुरु आहे.
पालिकेच्या मोहिमेचे फलीत
सप्टेंबर ते ऑक्टोंबर या दोन महिन्यात 1 लाख 27 हजार 916 गृहभेटी झाल्या. त्यात 9491 घरामध्ये डासअळ्या सापडल्या. 3 लाख 55 हजार 494 पाणी टाक्या-साठ्यांची तपासणी झाली. त्यापैकी 11 हजार 898 मध्ये डासअळ्या सापडल्या. 2 हजार 776 पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस अळी नाशकाची फवारणी. साचलेल्या पाण्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याची मोहिम.
"" सध्या सर्दी ताप, कणकण अशी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना थंड वाऱ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कान, नाक झाकून घ्या. उबदार कपडे वापरा. पाणी उकळून प्या. रात्री झोपताना वाफ घ्या.''
डॉ.राजेंद्र भागवत