
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी गेल्या अडीच महिन्यांनंतर उच्चांकी आकडेवारी सांगली जिल्ह्यात दिसून आली. एका दिवसात 30 जणांना बाधा झाली असून तासगाव तालुक्यात बारा जणांना बाधा झाली आहे.
सांगली : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी गेल्या अडीच महिन्यांनंतर उच्चांकी आकडेवारी सांगली जिल्ह्यात दिसून आली. एका दिवसात 30 जणांना बाधा झाली असून तासगाव तालुक्यात बारा जणांना बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, आज उपचारादरम्यान खानापूर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आज ग्रामीण भागात 27, शहरी भागात एक आणि महापालिका क्षेत्रात 3 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची गेल्या अडीच महिन्यांत सरासरी 13 इतकी होती. आज दिवसभरात तीस जणांना बाधा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढतोय अशी स्थिती जिल्ह्यात तयार झाली आहे. दुसऱ्या बाजूला महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसांत तिघांना बाधा झाली.
आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत 660 जणांचे स्वॅब तपासले. त्यात 11 जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 1186 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 19 जण कोरोना बाधित आढळले. आज आढळलेल्या 30 कोरोना बाधित रुग्णांत तासगाव तालुक्यातच 12 रुग्ण आढळून आले आहेत. आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ येथे प्रत्येकी दोन बाधित आढळून आले.
जत तालुक्यात पाच, वाळवा तालुक्यात तीन आणि कडेगाव तालुक्यात एकास बाधा झाली. महापालिका क्षेत्रात सांगली शहरातील तिघांना बाधा झाली. 8 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 157 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 28 जण चिंताजनक आहेत. 95 रुग्ण गृहअलकीकरणात असून 58 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
आज दिवसात तीस जणांना बाधा झाली. गेल्या काही दिवसांतील ही मोठी रुग्णसंख्या आहे. कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली
जिल्ह्यातील चित्र
- आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण- 48475
- आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46560
- सध्या उपचार घेणारे रुग्ण- 157
- आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1758
- ग्रामीण भागातील रुग्ण- 24511
- शहरी भागातील रुग्ण- 7243
- महापालिका क्षेत्र रुग्ण- 16721
कोरोना तालुकानिहाय चित्र
आटपाडी- 2501, जत- 2338, कडेगाव- 2965, कवठे महांकाळ- 2492, खानापूर- 3010, मिरज- 4553, पलूस- 2632, शिराळा- 2300, तासगाव- 3447, वाळवा- 5516, महापालिका- 167521
संपादन : युवराज यादव