डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया आजारांनी सांगलीकरांना "ताप' 

शैलेश पेटकर
Friday, 21 August 2020

कोरोनाची लढाई सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या रोगांनी सांगलीकर फणफणले आहेत. घरटी एक रुग्ण आढळून येत असून महापालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त दिसत आहे.

सांगली : कोरोनाची लढाई सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या रोगांनी सांगलीकर फणफणले आहेत. घरटी एक रुग्ण आढळून येत असून महापालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त दिसत आहे. महापालिका नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यवधींची तरतूद करते, पण हे पैसे जातात कुठे ?, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गेल्या वर्षात डास प्रतिबंधकासाठी कोट्यवधींची धूर आणि औषध फवारणी झाली. तरीही साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे. पालिकेच्या या ढिम्म यंत्रणेला नागरिकांचा जीव गेल्यावर जाग येणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. 

गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांची औषध खरेदी करण्यात आली. त्यातून धूर आणि औषध फवारणीही करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, तरीही डेंगी, हिवताप, चिकनगुनीयासारख्या रोगांचे थैमान शहरात सुरू आहे. यामुळेच औषध फवारणीच्या पडद्याआड चालणारी फसवणूक उघड होत आहे. दिवसातून दोन वेळा धुरीकरण आणि औषध फवारणी होते. मात्र त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, असे चित्र आहे. औषध फवारणीच्या नियोजनाचे कागदी घोडे नाचवण्यापुरता आरोग्य विभाग काम करतो आहे. 

सध्य स्थितीत नदीचे पाणी ओसरू लागल्याने पूराचे पाणी आलेल्या भागात साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्‍यता त्याठिकाणीही औषध फवारणीसाठी वेळ मिळेना. धक्कादायक म्हणजे कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतरी त्याठिकाणी होणारी औषध फवारणीही होताना दिसेना झाली आहे. अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारीही करूनही प्रशासनास जाग आलेली नाही. रामभरोसे चाललेल्या या कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्‍यात येवू लागला आहे. 

पुन्हा तीन कोटींची औषधे 
आजच्या स्थायी समितीच्या सभेता तीन कोटी 10 लाखांची औषध खरेदीचा घाट घालण्यात आला आहे. यापूर्वी खरेदी केलेली औषधे मुरली कोठे?, त्याच त्या कंपन्यांकडून दर्जाहीन औषधे खरेदी का केली जातात असा सवाल उपस्थित होत आहे. 

30 कोटींचा खर्च 
आरोग्य विभागाकडून वर्षिक तीस कोटींचा खर्च केला जातो. त्यात औषध फवारणीसह कचरा व्यवस्थापन, स्वच्छतेसाठी हा निधी खर्च केला जातो. तरीही शहरात साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे. 

जिल्ह्यात 80 जणांना डेंग्यू 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेशी निगडीत हिवताप नियंत्रण विभागातून किटकजन्य आजारांचे नियंत्रण होते. त्यासाठी वेगळा निधी उपलब्ध नाही. जानेवारी 2020 पासून जिल्ह्यात एक लाख 84 हजार 818 लोकांची मलेरियाची तपासणी केली. पैकी 8 रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 318 जणांना डेंग्यूसदृश्‍य आजार झाल्याने तपासणी केली. त्यातील 80 जणांना डेंग्यूची बाधा झाली. चिकणगुनियाचे 78 नमुने पाठवले होते.

जुलैमध्ये 12 नमुने पाठवले होते, 5 बाधित आढळले, असे जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी शुभांगी अधटराव यांनी सांगितले. या विभागाला कर्मचारी खर्चासाठीचा निधी मिळतो. थेट आरोग्य उपसंचालक कार्यालयातून साहित्य खरेदी होते आणि पुढे पुरवठा केला जातो. या विभागात लॅब टेक्‍निशिअन 37, सुपरवायझर 5, आरोग्य सहायक 49, आरोग्य कर्मचारी 62 आहेत. क्षेत्र कर्मचारी चार आणि एक पंप मेकॅनिक आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम करतात. 

महापालिकेचे आरोग्य विभागाची यंत्रणा जंतुनाशके डास फवारणी करता कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. परंतु त्याचा वापर प्रभावी होत आहे का ? कोरोनाबरोबर चिकनगुनिया, मलेरिया, डेंगीने सांगलीकर त्रस्त असताना महापालिका प्रशासन व कारभारी घनकचरा निविदामध्ये व्यस्त आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष द्यायला कारभाऱ्यांना वेळ मिळेना झालाय. डास फवारणी यंत्रणा प्रभावीपणे चालते का हे पाहणे गरजेचे आहे. 
- शेखर माने, माजी नगरसेवक 

साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी कोट्यवधींची औषध खरेदी केली जाते. मात्र, सद्यस्थितीत त्या औषधचा कोणताही फायदा झालेला दिसत नाही. कोरोनाबरोबरीने डेंगी, चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहे. आरोग्य विभाग दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. 
- सतीश साखळकर, सर्व पक्षीय कृती समिती. 

साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी सकाळच्या टप्प्यात औषध फवारणी आणि सायंकाळी धूर फवारणी केली जाते. प्रभागनिहाय तापसणी पथके तैनात करण्यात आले असून संशयितांची तत्काळ चाचणी करण्यात येत आहे. 
- डॉ. रवींद्र ताटे, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanglikars get 'fever' due to dengue, malaria, chikungunya