esakal | सांगलीकरांनो...! कोरोना संकट टाळून  ऐक्‍याची व आरोग्यदायी गुढी उभारा 
sakal

बोलून बातमी शोधा

gudhi.jpg

सांगली-यंदा मराठी नववर्षाच्या अर्थात गुढी पाडवा सणावर सर्वत्र "कोरोना' चे सावट दिसून आले. नेहमीच्या पारंपारिक उत्साहाला फाटा देत साधेपणाने गुढी उभारण्यात आल्याचे चित्र दिसले. "लॉक डाऊन' मुळे पाडव्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. सोशल मिडियावर देखील ऐक्‍याची गुढी उभारून जगावरील "कोरोना' चे संकट टळण्याचे साकडे घातले. 

सांगलीकरांनो...! कोरोना संकट टाळून  ऐक्‍याची व आरोग्यदायी गुढी उभारा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली-यंदा मराठी नववर्षाच्या अर्थात गुढी पाडवा सणावर सर्वत्र "कोरोना' चे सावट दिसून आले. नेहमीच्या पारंपारिक उत्साहाला फाटा देत साधेपणाने गुढी उभारण्यात आल्याचे चित्र दिसले. "लॉक डाऊन' मुळे पाडव्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. सोशल मिडियावर देखील ऐक्‍याची गुढी उभारून जगावरील "कोरोना' चे संकट टळण्याचे साकडे घातले. 


गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरवात. अनेक कुटुंबे घरासमोर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करतात. परंतू यंदाच्या गुढी पाडव्यावर "कोरोना' चे सावट पसरले आहे. गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला गुढीची काठी, साखरेच्या माळा आणि इतर वस्तूंचे स्टॉल सजले जातात. परंतू "लॉक डाऊन' मुळे यंदा हे चित्र बघायला मिळाले नाही. यंदाचा पाडवा साधेपणाने साजरा करा असा संदेश कालपासून "व्हॉटस्‌ ऍप' फिरत होता. गुढीसाठी साखरेची माळ, कडुनिंबाची डहाळी नाही मिळाली तरी पारंपारिक पद्धतीऐवजी घरी असलेल्या काठीस रेशमी वस्त्र बांधून पूजन करावे. घरात काठी नसेल तर रांगोळीने किंवा कागदावर गुढीचे चित्र काढून त्याचे पूजन करून जगाच्या आरोग्यासाठी शिस्तीचे पालन करेन अशी प्रार्थना म्हणण्याचे आवाहन केले होते. त्याला आज प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले.

साधेपणाने अनेकांनी घरासमोर, बंगल्याच्या टेरेसवर, फ्लॅटच्या खिडकीत गुढी उभारली. तर अनेकांनी यंदा गुढी उभारली नसल्याचे दिसले. त्याऐवजी केवळ सोशल मिडियावरून शुभेच्छा दिल्या. गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या शुभेच्छांच्या पाऊस प्रतिवर्षी "व्हॉटस्‌ ऍप' आणि "फेसबुक' वर पडतो. परंतू सोशल मिडियावरील गुढी पाडव्यांच्या शुभेच्छांवर "कोरोना' चे सावट दिसले. अनेकांनी पारंपारिक शुभेच्छांऐवजी "कोरोना' च्या संकटावर मात करण्यासाठी ऐक्‍याची गुढी उभारा असा संदेश दिला. जगावरील संकट टळून सर्वांना निरोगी आरोग्य लाभो अशाही अनेकांनी शुभेच्छा दिल्या. कोरोना विरूद्ध प्रतिकार करण्याचे सर्वांना बळ मिळूदे तसेच देशहिताची गुढी उभी राहू दे असा संदेश शुभेच्छातून दिला. 

यंदा पाडव्यानिमित्त मोठी उलाढाल होईल या आशेने इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपन्या, मोबाईल कंपन्या, दुचाकी व चारचाकी गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, सराफ, बांधकाम व्यवसायिक आदींनी तयारी केली होती. आर्थिक मंदीनंतर मोठी उलाढाल होईल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतू कोरोना चे सावट जगभर पसरल्यामुळे गेले दोन आठवडे चिंतेत गेले. त्यानंतर "लॉक डाऊन' ची वेळ आल्यामुळे यंदाचा पाडवा त्यांच्यासाठी निराशाजनक ठरला आहे.