पुण्यातील 52 कोटींच्या "जीएसटी' घोटाळ्यात सांगलीचा सूत्रधार की प्यादे?

प्रमोद जेरे
Sunday, 25 October 2020

बोगस कंपन्याद्वारे केंद्रिय जीएसटी विभागाकडून 52 कोटी रुपयांचा कर परतावा घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीतील सूरज पाटील यांचे नाव पुढे आले आहे.

मिरज (जि. सांगली ) : बोगस कंपन्याद्वारे केंद्रिय जीएसटी विभागाकडून 52 कोटी रुपयांचा कर परतावा घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीतील सूरज पाटील यांचे नाव पुढे आले आहे. पाटील कॉन्ट्रॅक्‍टर नावाने या फर्मद्वारे एक कोटीचा परतावा घेतला आहे. या प्रकरणातील ते प्यादे की सूत्रधार हा तपासाचा भाग आहे. 

पुण्यातील तुषार अशोक मुनोत (वय 36) याला जीएसटीच्या इंटेलिजन्स विभागाने भुम परांडा (जि. लातुर) येथे अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या फसवणुकीतील एक बोगस कंपनी सांगलीच्या सूरज पाटील यांची आहे. ते बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांच्या नावे 30 कोटींच्या इंजिनिअरिंग साहित्याची विक्री करून 18 टक्के जीएसटीचा परतावा घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. पाटील यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे या घोटाळ्यातील त्यांची नेमकी भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. 

पुण्याच्या स्वारगेट परिसरात तुषार मुनोत याने रितू आणि रिया एंटरप्राइजेस यासह पाच कंपन्या स्थापन केल्या. यापैकी तीन कंपन्या बोगस असल्याचे जीएसटी इंटेलिजन्स विभागाच्या निदर्शनास आले. या कंपनीच्या आणि तिच्या मालकांचा तपास सुरू आहे.

पाटील सध्या पुण्यात असल्याचे सांगण्यात आले. मात्र ते प्यादे की सूत्रधार हे स्पष्ट नाही. त्यांच्या कागदपत्रांची चोरी करून बोगस कंपनी असू शकते असाही येथील काही अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या फर्मवर मोठी उलाढाल दिसते. त्यातून सुमारे कोटींचा परतावा घेतला आहे. या प्रकरणात बोगस बिलांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. 

घोटाळा कसा झाला? 
वस्तुची प्रत्यक्षात खरेदी विक्री न करता तब्बल 317 कोटी रुपयांची बोगस बिले तयार करून जीएसटीमधील क्रेडिट सवलतीचा लाभ उचलून 18 टक्‍क्‍यांनी जीएसटी भरल्याचे भासवून 52 कोटी रुपयांचा परतावा मिळवला आहे. मात्र जीएसटी करप्रणालीतील "नेटवर्क सपोर्ट' द्वारे जीएसटी इंटिलिजिअन्स विभागाकडून हा घोटाळा उघडकीस आला. यात असे घोटाळे वारंवार होतात पण लगेच उघडकीसही येतात. ते होण्याआधी लक्षात येणे गरजेचे आहे, असेही अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli's mastermind or pawn in '52 crore' GST scam in Pune?