कोरोना बाधित मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांचे निधन 

घनश्‍याम नवाथे
Tuesday, 8 September 2020

सांगली- कोरोना बाधित मृत रूग्णांवर अंत्यसंस्कार केल्या जाणाऱ्या  मिरज-पंढरपूर रस्त्यावरील कोविड स्मशानभूमीत सध्या जबाबदारी पाहणाऱ्या स्वच्छता निरीक्षक सुधीर कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. श्री. कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते म्हणून परिचित होते. 

श्री. कांबळे हे महापालिका सेवेत येण्यापूर्वी भारतीय दलित पॅंथर, रिपाई, युवा क्रांती मंचच्या माध्यमातून चळवळीत कार्यरत होते. निर्भिड आणि धाडसी व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. मराठवाडा नामांतर लढा व रिडल्स आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला होता. महापालिकेत आईच्या जागेवर नोकरी करत त्यांनी चळवळीचे मार्गदर्शक म्हणून काम केले. मिरज म्युनिसिपल सोसायटीचे ते विद्यमान अध्यक्ष होते. 

सध्या कोविड आपत्तीच्या काळात मिरज-पंढरपूर रस्त्यावरील कोविड स्मशानभूमीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांच्या नियंत्रणाखाली कोरोना बाधित मृत रूग्णांवर अंत्यसंस्कार केले जात होते. काही दिवसापासून त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मिरज येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोविड योद्धा हरपला अशा प्रतिक्रिया उमटल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanitation inspectors who conducted funerals on corona-infected dead