संजय राऊत बेळगावात दाखल, पोलिसांकडून दडपशाही सुरूच...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

संजय राऊत यांनी विरोध झाला तरी बेळगावाला जाणारच अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस तैनात केले आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बेळगाव - पोलिसांची दडपशाही असली तरी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेला उपस्थित राहण्यासाठी खासदार संजय राऊत बेळगावात दाखल झाले आहे. सांयकाळी 5:30 वाजता गोगटे रंगमंदिर येथे संजय राऊत यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उदघाटन होणार आहे. यावेळी त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलीस बंदोबस्त ठेऊन कार्यकर्त्यांवर दबाव

या कार्यक्रमाला राऊत उपस्थित राहू नयेत यासाठी कर्नाटकी प्रशासनाकडून आयोजकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र संजय राऊत यांनी विरोध झाला तरी बेळगावाला जाणारच अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस तैनात केले आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सांबरा विमान तळावर राऊत यांचे स्वागत करण्यासाठी वाचनालयाचे पदाधिकारी व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी, प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, महेश जुवेकर, सुनील आंनदाचे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी "बेळगाव, कारवार निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. विमानतळावर प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेऊन कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.तरीही राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut arrives in Belgaum marathi news

टॉपिकस
Topic Tags: