esakal | ...म्हणून उज्ज्वल निकमांनी दिला आंध्र प्रदेशातील खटल्याचा दाखला
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून उज्ज्वल निकमांनी दिला आंध्र प्रदेशातील खटल्याचा दाखला

संपूर्ण जिल्ह्याला हादरविणाऱ्या व राज्यात चर्चेच्या ठरलेल्या वाई धाेम खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी पाच मार्चला होणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

...म्हणून उज्ज्वल निकमांनी दिला आंध्र प्रदेशातील खटल्याचा दाखला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : मंगला जेधेंच्या खुनाच्या संशयावरून पोलिस आपल्या मागावर आहेत, अशी माहिती संतोष पोळने ज्योती मांढरे हिला दिली होती. त्यामुळे संतोषच्या सांगण्यावरून वाईचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या धमकीचे पत्र तत्कालीन पोलिस अधीक्षकांना दिल्याची कबुली ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली.
 
संपूर्ण जिल्ह्याला हादरविणाऱ्या व राज्यात चर्चेच्या ठरलेल्या या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. वाईतील हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने मागच्या सुनावणीवेळी सातारा जिल्हा न्यायालयात संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगला जेधे यांचा इंजेक्‍शन देऊन खून केला आणि त्यानंतर आनंद व्यक्त करून त्याने जेधेंच्या अंगावरील सोने व रोकड लुटली, अशी साक्ष दिली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहात असून, सुनावणीसाठी ते आज न्यायालयात उपस्थित होते. वाई खून प्रकरणात अनेक घडामोडींनंतर गुरुवारनंतर शुक्रवारी या खटल्यातील महत्त्वाची माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची साक्ष झाली.

साक्ष देताना ज्योती म्हणाली, ""एक जुलै 2016 रोजी मी संतोषच्या सांगण्यावरून आम्ही खून केलेल्या सलमा यांची मैत्रीण ज्युलीला जेधेंच्या फोनवरून फोन केला. तेव्हा ज्युलीसोबत माझे वडील बोलले होते. त्यानंतर जेधेंचा मोबाईल मी संतोषला परत दिला होता. त्यानंतर मी व संतोष दोघे भुईंज येथे मला संतोषने भेट दिलेल्या दुचाकीवरून आलो. ती दुचाकी एका ठिकाणी पार्क करून आम्ही दोघे ठाणे येथे गेलो. त्याठिकाणी आम्ही "अप्पर स्टे हाऊस' या हॉटेलमध्ये दोन दिवस राहिलो होतो. त्यानंतर आम्ही मुंबईत पोचलो व तिथे विविध धर्मशाळांत आम्ही राहिलो. त्यानंतर आम्ही 10 ऑगस्ट 2016 रोजी वाईला आलो.'' संतोष पोळ विरोधात धनादेश न वटल्याचा खटला पुणे येथील न्यायालयात सुरू होता. त्या खटल्यात त्याला अटक वॉरंट असल्याने आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालो होतो. त्या वेळी मंगला जेधेंच्या खुनाच्या संशयावरून पोलिस आपल्या मागावर असल्याची माहिती मला संतोषने दिली होती. वाईचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे पत्र संतोषच्या सांगण्यावरून मी त्यावेळच्या एसपींना पाठवले होते. त्याचदिवशी मला वाई पोलिसांनी अटक केली, असे तिने न्यायालयात सांगितले. 

हेही वाचा : लग्नानंतर दाेन वर्षांनी बसला ज्याेतीला धक्का

पुढील सुनावणी पाच मार्चला 

उज्ज्वल निकम यांनी ज्योतीने केलेले अर्ज, तसेच संतोषसोबत ती राहिलेल्या हॉटेलमधील रेकॉर्डची प्रत न्यायालयाच्या समोर यावी, अशी मागणी केली. मात्र, पोलिसांनी तपास केलेला असून, पुढील तपास पोलिसांना आता करता येणार नसल्याचे सांगून त्यास बचाव पक्षाच्या वकिलांनी विरोध केला. त्यावर ऍड. निकम यांनी आंध्र प्रदेशातील एका खटल्याचा दाखला देत, ज्योती सांगत असलेल्या गोष्टी खऱ्या की खोट्या हे पाहायचे असेल तर त्या न्यायालयात समोर यायलाच पाहिजेत, अशी मागणी केली. त्यावर ते दोन्ही पुरावे पुढील सुनावणीवेळी हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. या खटल्याची पुढील सुनावणी पाच मार्चला होणार असल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.

loading image