लग्नानंतर दाेन वर्षांनी बसला ज्याेतीला धक्का

लग्नानंतर दाेन वर्षांनी बसला ज्याेतीला धक्का

सातारा : संतोष पोळने माझ्यासमोर तीन खून केल्याचे, तसेच त्यापूर्वी त्याने एकट्याने तीन खून केले असल्याचे मला सांगितले आहे, अशी साक्ष वाई-धोम हत्यासत्रातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने न्यायालयीन सुनावणीदरम्यान दिली. ही सुनावणी एेकण्यासाठी न्यायालय परिसरात गर्दी झाली हाेती.
 

साक्षीमध्ये ज्योती म्हणाली, ""वाई येथील डॉ. घोटवडेकर यांच्या दवाखान्यात असताना 2013 मध्ये माझी संतोष पोळशी ओळख झाली. 13 ऑक्‍टोबर 2013 रोजी आम्ही दोघांनी वाईतील गायत्री मंदिरात लग्न केले. त्यानंतर सहा महिन्यांत काम सोडून मी नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला. तीन वर्षांत माझे प्रशिक्षण पूर्ण झाले. लेखी परीक्षाही दिली. तोंडी परीक्षेपूर्वी मला मंगल जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या काळात मी तीन सिमकार्ड वापरून पोळशी सतत संपर्क साधत होते. मार्च 2015 मध्ये डॉ. घोटवडेकरांनी कामावरून काढून टाकल्याने मला पैशाची चणचण भासू लागली. त्यांनी संतोष पोळला भाड्याने ऍम्बुलन्स चालवायला दिली होती; परंतु हप्ते न भरल्याने त्यांनी ती परत घेतली.''

 हेही वाचा - महाबळेश्वर बस अपघातात एक ठार ; १७ जखमी
 
नोव्हेंबर 2015 मध्ये "तुम्ही प्रॅक्‍टिस सुरू करा,' असे मी संतोष पोळला म्हणाले. तेव्हा "माझी डिग्री खोटी आहे, रजिस्ट्रेशन झाले नाही' असे तो म्हणाला. तेव्हा मला धक्का बसला. त्यानंतर माझ्याकडे एक प्लॅन आहे, असे त्याने मला सांगितले. लोक मला डॉक्‍टर समजतात. मी तपासणीच्या बहाण्याने त्यांना बोलवतो. आपण त्यांना मारून दागिने लूट, असे तो म्हणाला.

आपण पकडले जाणार का असे म्हटल्यावर त्याने यापूर्वी मी सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड व जगाबाई पोळ यांचा खून केल्याचे मला सांगितले. "कसे मारतो, मृतदेहाचे काय करतो,' याबाबत विचारणा केली. त्या वेळी इंजेक्‍शन द्यायचे नैसर्गिक मृत्यू आल्यासारखे वाटते. कोणाला संशय येत नाही, असे त्याने मला सांगितले. ही इंजेक्‍शन डॉ. घोटवडेकर हॉस्पिटलमधील मित्र आजीब मुजावर मला देतो, असेही तो म्हणाला. त्याने नथमल, सलमा व मंगल जेधे यांचे खून केल्याची साक्षही ज्योती मांढरेने न्यायालयासमोर दिली. त्याचबरोबर सलमा जिवंत आहे, असे दाखविण्यासाठी संतोषच्या सांगण्यावरून व त्याने दिलेल्या सलमाच्या मोबाईलवरून मी तिच्या दोन मैत्रिणींना फोन केला. त्यातील वैशाली करपे हिचा पुन्हा फोन आल्यावर वाचवा-वाचवा असे म्हणून मी फोन बंद केल्याचेही ज्योतीने न्यायालयात सांगितले. 

हेही वाचा -  गाढवांचा बंदाेबस्त करा ; राऊत, आव्हांडावर सातारकरांचा हल्लाबाेल


साक्ष देताना ज्योती मांढरेला त्रास 

साक्षीदरम्यान ज्योतीला आज प्रकृतीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे दुपारी न्यायालयाने तिला पाणी व खुर्ची देण्यास सांगितले. त्यानंतर तिची खुर्चीत बसूनच साक्ष झाली. तिची साक्ष पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे न्या. मोरे यांनी आज (शुक्रवार, ता. 17) पुन्हा सुनावणी ठेवली आहे. या वेळी येताना सर्व औषधे सोबत घेऊन येण्याच्या सूचना त्यांनी ज्योतीला केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com