सातबारा वाजवितोय बारा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

सातारा - सातबारा आणि आधारकार्ड असेल तरच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी अनुदानित बी-बियाणे व खते द्यावीत, असा आदेश कृषी आयुक्तालयाने नुकताच दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या अवकाळी आदेशाचा फटका बसत आहे. सातबारा संगणीकरणाचे काम पूर्ण झाले नसल्याने सात-बारा मिळविताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे. 

पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे तत्काळ नियोजन करा, असे आदेश मंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाला दिले आहेत. तर, दुसरीकडे मात्र अनुदानित बी-बियाणांचे आणि खतांचे वाटप करताना शेतकऱ्यांकडून आधारकार्ड आणि सातबारा उतारा घेण्याची सक्ती केली आहे.

राज्यभरात ऑनलाइन सातबारा नोंदणीचे काम सुरू आहे. अद्यापही ही किचकट प्रक्रिया जिल्ह्यात पूर्णत्वाला गेली नाही. आताच एखाद्या कारणासाठी सात-बारा घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना मिळत नाही. चुकून यात त्रुटी असतील तर त्या दुरुस्तीसाठी हजारो रुपये द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. यातच आता अनुदानित बी-बियाणे मिळविण्यासाठी सातबारा उतारा घ्यायचा म्हटले तर खाबूगिरी वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात तीन लाख ८० हजार हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित केले आहे. खरिपामध्ये शेतकऱ्यांना आवश्‍यक सुविधा प्राधान्याने मिळवून देण्याबाबत वरिष्ठ स्तरांवरून आदेश दिले आहेत. याशिवाय बियाणे, कीटकनाशक वेळेत मिळावीत, असाही आग्रह धरला आहे. 

वळवाचा पाऊस झाल्यानंतर बियाणे व खतांची मागणी सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत सातबारा मिळत नाही. त्यामुळे ही अट शिथिल करावी, अशी मागणी होत आहे. 

Web Title: sat bara issue agriculture farmer