व्यावसायिक हवालदिल! 

शैलेन्द्र पाटील
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

सातारा - शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. या कामामुळे शहराच्या अर्थवाहिन्या असलेले तीन प्रमुख रस्ते गेले पाच महिने बंद झाल्याने पोवई नाका परिसरातील शेकडो व्यावसायिक हवालदिल आहेत. व्यवसायावर झालेल्या परिणामांमुळे काहींनी आपले व्यवसाय इतरांना चालवण्यास देऊ केले आहेत. तर काहींनी शहरातच तात्पुरते स्थलांतर केले आहे. चांभार, किल्ली करणारे, पानपट्टी-चहाचा ठेला चालवणारे छोटे विक्रेते हे अर्थवाहिनी पूर्वपदावर येण्याची आस लावून बसले आहेत. 

सातारा - शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. या कामामुळे शहराच्या अर्थवाहिन्या असलेले तीन प्रमुख रस्ते गेले पाच महिने बंद झाल्याने पोवई नाका परिसरातील शेकडो व्यावसायिक हवालदिल आहेत. व्यवसायावर झालेल्या परिणामांमुळे काहींनी आपले व्यवसाय इतरांना चालवण्यास देऊ केले आहेत. तर काहींनी शहरातच तात्पुरते स्थलांतर केले आहे. चांभार, किल्ली करणारे, पानपट्टी-चहाचा ठेला चालवणारे छोटे विक्रेते हे अर्थवाहिनी पूर्वपदावर येण्याची आस लावून बसले आहेत. 

पोवई नाक्‍यावर शिवाजी सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीवर "ग्रेड सेपरेटर' हा उपाय काढण्यात आला. मार्चमध्ये कामाला सुरवात झाली. त्यानंतर गेले पाच महिने कर्मवीर पथावरून शिवाजी सर्कलकडे होणारी वाहतूक बंद आहे. राजपथावर मराठा खानावळीच्या दारात वाहतुकीसाठी चिंचोळा रस्ता होता. परंतु, तोही परवाच्या दुर्घटनेमुळे बंद करण्यात आला. तहसील कार्यालय ते बस स्थानक रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. कर्मवीर पथ खुला होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागेल, असे विकसक कंपनी सांगत असली तरी प्रत्यक्षात किती वेळ लागतो, हे सांगणे कठीण आहे. 

या कामामुळे संपूर्ण शिवाजी सर्कल परिसरातील व्यापाराला जबरदस्त झळ बसली आहे. कायम गजबजलेला दिसणारा कासट मार्केट परिसर सुनासुना भासतो. उद्देश ठेवून खरेदी करणारे, तसेच नेहमीचे ग्राहकच दुकानात जातात. बाकी जाता-जाताची खरेदी पूर्णपणे थांबली आहे. त्याचा 50 ते 60 टक्के परिणाम व्यापारावर झाला आहे. कर्मवीर पथावर केवळ कासट मार्केट परिसर बाधित झालेला नाही; पंताचा गोट, पोलिस लाईनपर्यंतचे व्यावसायिक ग्राहकांचा राबता कमी झाल्याने चिंतेत आहेत. 

कर्मवीर पथापेक्षा मरिआई कॉम्प्लेक्‍स परिसरातील व्यवसायावर अधिक परिणाम जाणवतो. कारण गेले पाच महिने येथे वाहनांच्या पार्किंगवर मर्यादा होत्या. आता रस्ता खचण्याच्या प्रकारानंतर सर्व काही ठप्प आहे. 40 ते 50 टक्के व्यवसाय कमी झाल्याच्या येथील व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया आहेत. बस स्थानकाकडे जाणारा रस्ता तहसील कार्यालयाजवळ बंद असल्याने तहसील कार्यालय ते बस स्थानक या रस्त्यावरील छोटे व्यावसायिक, सायंकाळी बसणारे रविवार पेठ भाजी मंडईतील विक्रेत्यांनाही "ग्रेड सेपरेटर'ची झळ बसली आहे. कधी एकदा काम पूर्ण होऊन पोवई नाका, शिवाजी सर्कल पूर्वपदावर येतंय, अशी सर्वांचीच चिंतीत भावना आहे. 

येथील व्यवसायावर 50 टक्के परिणाम झाला आहे. नेहमीचे ग्राहक असले तरी मार्ग बदलल्याने ग्राहक सहज, सोपं होईल अशा ठिकाणी जातात. कर्मवीर पथ खुला होईपर्यंत वाट पाहत राहणे, एवढेच हातात आहे.'' 
- मोहनशेठ राजपुरोहित, न्यू राजपुरोहित स्विट्‌स, सातारा 

एखाद्या ग्रामीण भागासारखी अवस्था झाली आहे. सदरबझार, खेड, गोडोली या भागातून येणारा ग्राहक कर्मवीर पथाकडे फिरकत नाही. एकाच शहराचे दोन भाग झाल्यासारखी अवस्था आहे. सायंकाळी पाच नंतरही रस्त्यावर दुपारसारखीच तुरळक वर्दळ असते. 
- संजय पाटील, संचालक, "पाटील वडेवाले', सातारा 

आमचा विकासकामाला विरोध नाही. परंतु, आमची रोजीरोटीही चालली पाहिजे. व्यवसायासाठी कर्ज काढलेले असते. इकडून-तिकडून हातउसने पैसे घेतलेले असतात. सहा महिने ते एक वर्ष व्यवसाय बंद राहिला तर चरितार्थ चालवायचा कसा, असा व्यावसायिकांचा सवाल आहे. 
- आत्माराम मोरे, चालक, गौरी पान शॉप 

Web Title: Satara City traffic stress on business