जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात उधळतोय "तो'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वाहणारा गार वारा सर्वांना मंत्रमुग्ध करतो. पण, सध्या याच दऱ्याखोऱ्यांना ग्रहण लागले आहे ते कोरोनाच्या संसर्गाचे... आतापर्यंत कोरोनापासून अलिप्त राहिलेल्या पाटण तालुक्‍यातील दऱ्याखोऱ्यातही त्याचा वारु उधळू लागला आहे. तालुक्‍यात पुणे- मुंबईकरांचे इनकमिंग सुरू होऊन आठवडा होत असतानाच, कोरोना रुग्णांचा आकडा 25 पार झाल्याच्या वृत्ताने दऱ्याखोऱ्यातील वारा थबकलायं... तर लोकही हबकलेत... 

पाटण (जि. सातारा) : गेली दोन महिने प्रशासनाचे नियोजन आणि जनतेने दिलेले सहकार्य यामुळे डेरवणमधील दहा महिन्यांच्या बालकाचा अपवाद वगळता तालुका कोरोनापासून दूर होता. मात्र, मुंबई- पुण्यासह अन्य शहरांतून येणाऱ्या लोकांमुळे तालुक्‍याच्या दऱ्याखोऱ्यात कोरोनाचा फास घट्ट होऊ लागला आहे. त्यामुळे पोलिस- प्रशासनाने दोन महिन्यांच्या घेतलेल्या परिश्रमावर पाणी फिरल्याचे चित्र दिसत आहे. गावागावांत निर्माण होणारी कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. 

गुढीपाडव्यापूर्वी तालुक्‍यामध्ये सुमारे 64 हजार चाकरमानी (शहरवासीय) दाखल झाले होते. त्यादरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव पाय पसरू लागलेला होता. 64 हजार चाकरमान्यांचे तालुक्‍यात इनकमिंग होऊनही प्रशासनाचे नियोजन आणि स्थानिकांनी घेतलेल्या गांभीर्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यात तालुक्‍याला यश आले. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात मुंबईहून आलेल्या डेरवणच्या लहान बाळाचा अपवाद वगळता कोरोनापासून तालुका दूर राहिला. शासनाने चौथ्या लॉकडाउनच्या काळात अटी शिथिल केल्याने शहरातून गावाकडे इनकमिंग सुरू झाले आहे. त्यामुळे दोन महिने बिनधास्त असणाऱ्या तालुक्‍याचे टेंन्शन वाढले. 

येणाऱ्यांकडून दक्षता घेण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले. गावागावांत कोरोनाबाबत जनजागृती झाल्यामुळे येणाऱ्या लोकांना क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक इमारतींत, तसेच संपूर्ण कुटुंबाचे इनकमिंग असल्यास होम क्वारंटाइनचा सक्तीने निर्णय अंमलात आणला. बनपुरी येथील क्वारंटाइन केलेल्या महिलेचा अचानक मृत्यू झाला. प्रशासनाने संबंधित महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठवला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच दिवशी शिरळला कोरोना पॉझिटिव्ह सापडला. तेव्हापासून तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. 

गुरुवारी कुंभारगाव, म्हावशी आणि धामणी येथील तीन रुग्णांची त्यात भर पडली. बाधित रुग्णांच्या सहवासातील नातेवाइकांना शुक्रवारी विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यातील अहवाल रात्री उशिरा आल्याने आज सकाळी तालुक्‍यात नवे 19 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. सापडलेल्या कोरोनाबाधितांचा विचार करता तालुक्‍याच्या दऱ्याखोऱ्यात कोरोनाचा फास आवळू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासन, पोलिस व स्थानिकांनी दोन महिन्यांपासून घेतलेल्या परिश्रमावर एका रात्रीत पाणी फिरल्याचे चित्र आहे. इनकमिंग सुरू होऊन आठवडा 
होत असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 25 पार झाल्याने चिंतेत भर पडली आहे. 

मुंबईहून आलेल्यांचा झटका 
दहा हजारांहून अधिक चाकरमान्यांचे इनकमिंग झाले असून, अजून शहरवासीयांचे इनकमिंग सुरूच आहे. सापडलेले रुग्ण बहुतांश मुंबईहून आलेल्यांपैकी आहेत. सलग दोन महिने बिनधास्त असणाऱ्या जनतेला मुंबईहून आलेल्यांनी झटका दिला आहे.

अंत्यसंस्कारासाठी त्या मृतदेहांची झाली ससेहोलपट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Worried About Increasing Corona Patient