अरे बापरे... विनापरवानगी येताहेत लोंढे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

रात्रीच्यावेळी विना परवानगी चोरीचुपके बाहेरच्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या अडीशेकडे चालली आहे. शेजारच्या जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांना तुर्तास परवानगी देऊ नका, असे जिल्हा प्रशासनाने सांगूनही लोकांचे लोंढे येतच असल्याने कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे. बाधितांची संख्या अशीच वाढत राहिल्यास त्यांच्यावर उपचार कुठे करायचे या प्रश्‍नाने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. 

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण संख्या दहावरच थांबली होती. त्यामध्ये परदेशातून प्रवास करून आलेल्यांचा समावेश होता. परिणामी जिल्ह्यातील स्थानिक कोणीही कोरोनाबाधित नसल्याने संसर्ग वाढण्याची शक्‍यता नव्हती. पण पुणे, मुंबईत कोरोनाचा संसर्ग अचानक वाढला. त्यामुळे तेथे अडकलेल्या सातारकरांनी स्वगृही येण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही. पण आता जिल्ह्याबाहेरील सर्वांना जिल्ह्यात येण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी नोंदणी करणे व आरोग्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे लोंढेच्या लोंढे जिल्ह्यात येऊ लागले आहेत. 

आतापर्यंत केवळ 25 ते 30 हजार लोक जिल्ह्यात आल्याचे ऑनलाइन आकडेवारीवरून दिसत असले तरी प्रत्यक्षात विनापरवानगी व चोरीचुपके जिल्ह्यात आलेल्यांची संख्या 90 हजारांवर गेली आहे. उर्वरित लोकांची कोणतीच नोंद नाही. आम्हाला कोणताच आजार नाही, मग आम्ही नोंदणी कशासाठी करायची असा प्रश्‍न लोक विचारत आहेत. तसेच जिल्ह्याच्या सिमा बंद असल्यातरी रात्रीच्यावेळी पोलिस यंत्रणेचा डोळा चुकवून प्रसंगी चिरीमिरी देऊन मोठ्या प्रमाणात गाड्या सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्‍यात येत आहे. मुळात स्थानिक रहिवासी कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी जिल्ह्यात येऊ नये, असे नाही. पण येताना त्यांच्यासोबत कोरोनाही येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांना त्यांच्यामुळे संसर्ग होत आहे. परिणामी शंभरीवरून कोरोनाबाधितांची संख्या 241 वर पोहोचली आहे. 

गेल्या चारपाच दिवसांत ही संख्या वाढली आहे. एकाच वेळी 20, 40 रूग्ण सापडत असल्याने जिल्हा प्रशासनास आरोग्य विभाग हादरला आहे. सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन शिथिल केले असून सर्व दुकाने सुरू केली आहेत. पण कोरोनाबाधितांचा आकडा प्रत्येक तालुक्‍यात वाढूू लागल्याने पुन्हा निर्बंध लादले जाण्याची भिती सातारकरांना वाटू लागली आहे. आधीच दोन महिने घरात बसून वैतागलेल्या लोकांना आता कुठे बाहेर पडायला मिळू लागले होते. पण बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून त्यांच्यासोबत कोरोनाही येऊ लागल्याने आता सर्वांचीच चिंता वाढली आहे. 

कोरोनाबाधितांचा आकडा वाढत गेल्यास वाढलेल्या रूग्णांवर उपचार कोठे करायचे या प्रश्‍नाने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. आता बाधितांची संख्या अडीचशे पार करून पुढे जाण्याचा धोका आहे. कारण जे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी सुरू केली आहे. त्यातून मोठ्याप्रमाणात रूग्ण वाढण्याची भिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. संभाव्या रूग्ण वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खासगी रूग्णालये, क्रिडांगणे, मंगल कार्यालये ताब्यात घेऊन तेथे रूग्णांची सोय करण्यासाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पण अचानक रूग्ण वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करायचे कुठे असा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण 
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्व रूग्णालयात केवळ संसर्ग झालेल्या शंभर रूग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कऱ्हाडमधील कृष्णा व सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सध्या वाढीव रूग्णांवर उपचार केले जात आहेत. आता रूग्ण संख्या वाढत असल्याने सातारा व फलटण तालुक्‍यातील काही खासगी रूग्णालये अधिग्रहीत करून त्यामध्ये वाढणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

सातारा : शनिवार घातवार; 40 रुग्ण वाढले; निर्बंधांचा कचाटा वाढणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The Health Department Is Concerned About The Increased Corona Threat From Incoming