esakal | ही स्पर्धा नव्हे, तर उत्सव - अदिती सारंगधर

बोलून बातमी शोधा

अदिती सारंगधर
ही स्पर्धा नव्हे, तर उत्सव - अदिती सारंगधर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सातारा - धुके, भुरभरणारा पाऊस, सर्वत्र हिरवळीचा गालीचा, वाजणारे ढोल अशा आल्हाददायक वातावरणातील सातारा हिल हाफ मॅरेथॉन माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ही स्पर्धा नव्हे तर जणू एक उत्सव होता. विशेष म्हणजे सातारा-कास रस्त्यावर कोठेही मला ना प्लॅस्टिक दिसले, ना कचरा दिसला.

‘सकाळ’ने राबविलेल्या ‘स्वच्छ कास, सुंदर कास’ या उपक्रमाचे हे फलित असावे. आपल्याकडील सौंदर्य जोपासण्यासाठी ‘सकाळ’ राबवित असलेल्या उपक्रमांमध्ये मलाही सहभागी व्हायला आवडेल, असे मत अभिनेत्री अदिती सारंगधर हिने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

आज येथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये अभिनेत्री सागंरधर सहभागी झाली होती. तिने २१ किलोमीटरचे अंतर दोन तासांत पूर्ण केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. स्पर्धेनंतर तिने ‘सकाळ’ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी गप्पा मारताना तिच्या साताऱ्यामधील बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. चारंभितीवरील भटकंती, राजवाडा चौपाटीवरील भेळ, आईसक्रीमची लज्जत आजही जिभेवर रेंगाळत असल्याचे तिने नमूद केले. अदिती म्हणाली, ‘‘माझी आत्या साताऱ्यात आहे. त्यामुळे साताऱ्याशी माझा कायम संबंध आला आहे. मी शाहू कलामंदिरात नाटकाचे कार्यक्रमही केले आहेत.

आजची मॅरेथॉन मी खरोखरच खूप ‘एन्जॉय’ केली. येवतेश्‍वर रस्त्यावरचे वातावरण सदैव उल्हसित करणारे होते. मी मनापासून धावले. ही स्पर्धा मी दीड तासात पूर्ण करेन, असा मला आत्मविश्‍वास होता. परंतु, काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘एन्जुरी’मुळे दोन तास अवधी लागल्याची खंत तिने व्यक्त केली. मी माझ्या बिझी ‘शेड्युल्ड’ मधून दररोज पहाटे पाच वाजता वेळ काढून एक तास धावण्याचा सराव करत असते. त्यात खंड पडू देत नाही.

मी एका मुलाची आई आहे. प्रसूतीनंतर वजन वाढले होते. त्यामुळेच मी धावण्याच्या व्यायामाकडे वळले. त्याचा मला नक्की फायदा झाला आहे. ही गोष्ट मी फेसबुकवरून समस्त महिलांना सांगते बरं का! काहीही असो ही स्पर्धा नव्हे, तर एक उत्सव असल्यासारखे जाणवले, असेही तिने नमूद केले.