25 लाखांसाठी अपहरण करुन केली हत्या, अडीच महिन्यानंतर सापडला मुलाचा मृतदेह....

Satara Kidnapping for twenty two lakhs And Murder
Satara Kidnapping for twenty two lakhs And Murder

नागठाणे (सातारा) - नागठाण्यातून दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आष्टे (पुनर्वसित, ता. सातारा) येथील अल्पवयीन युवकाचा २५ लाखांच्या खंडणीसाठी निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) तिघांना अटक केली आहे.

आशिष बन्सीराम साळुंखे (वय २९) व साहिल रुस्तुम शिकलगार (वय २९, दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा) व शुभम ऊर्फ सोन्या संभाजी जाधव (वय ३०, रा. मोळाचा ओढा, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
तेजसला व्यायामाची आवड होती. ११ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास तो दुचाकीवरून नागठाणे येथे व्यायामासाठी गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे घरातल्यांनी त्याचा शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी बोरगाव पोलिस ठाण्यात तेजस बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान, त्याच दिवशी आष्टे गावापासून जवळच तेजसची दुचाकी सापडली होती. या गाडीच्या ठिकाणी दुसऱ्या एका गाडीची चावीसुद्धा आढळून आली होती. हा प्रकार त्याच्या वडिलांनी बोरगाव पोलिसांना सांगितला होता. 

तेजसच्या वडिलांना आला होता फोन

दोन महिन्यांपासून तेजसचा सर्व जण शोध घेत होते. बेपत्ता तेजसच्या कुटुंबीयांनीही खासगी ड्रोनच्या साहाय्याने आष्टे, सोनापूरसह गणेशवाडीचा डोंगर परिसर पिंजून काढला. मात्र, तेजसचा काहीच ठावठिकाणा लागला नसल्यामुळे या प्रकरणातील गूढ चांगलेच वाढले होते.
या दरम्यान एकाचा तेजसच्या वडिलांना फोन आला होता. तुमच्या मुलाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले असल्याचे त्याने त्यांना सांगितले. या फोनची कल्पनाही त्यांनी बोरगाव पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आशिष साळुंखे याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याकडून फारसी माहिती उपलब्ध न झाल्याने त्याला सोडून देण्यात आले. 
हे प्रकरण गंभीर असल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांनाही दिल्या होत्या. त्यांनी उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नृेत्वाखाली तपास पथक तयार करून त्यांना अपहरण झालेल्या मुलाचा व संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने घटनास्थळाला भेट देऊन अपहरण झालेल्या मुलाची संपूर्ण माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यानुसार त्यांनी नागठाणे येथील काही युवकांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. त्यातील एकाला त्यांनी आज ताब्यात घेतले. 

कसून तपासामध्ये खून प्रकरणाचा उलगडा झाला

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. सुरवातीला त्याने तपास भरकटवण्यासाठी वेगवेगळी माहिती सांगितली. वेगवेगळे लोक त्याला घेऊन गेल्याचे तो पोलिसांना सांगत होता; परंतु तपास पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घटनेचा शास्त्रोक्त पद्धतीने कौशल्य पणाला लावत त्याने सांगितलेल्या प्रत्येक मुद्‌द्‌याची शहानिशा केली. ती चुकीची आहे, असे समोर आल्याने संशयितासमोर गुन्हा केल्याचे सांगण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कसून तपासामध्ये खून प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर त्यांनी आशिष व त्याचा मित्र साहिल शिकलगार यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी तेजसच्या खुनाची कबुली दिली आहे. त्यांनी तेजसचा मृतदेह टाकलेली जागा दाखवली. त्या ठिकाणी पोलिसांना मृतदेहही सापडला. हे तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. तेजस्वी सातपुते, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबिन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नितीन गोगावले, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, अजित कर्णे, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, विजय सावंत तसेच बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांनी आज मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढले. त्यानंतर तेजसचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

खंडणीसाठी रचला कट..

नागठाणे हद्दीतील महामार्गालगतची जमीन तेजसच्या वडिलांनी विकली होती. त्यातून त्यांना भरपूर पैसे मिळाले होते. त्यामुळे त्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून २५ लाख रुपये खंडणी मागण्याचा प्लॅन त्यांनी तेजसला उचलण्यापूर्वी एक महिना आधीच केला होता. दत्तजयंतीदिवशी आष्टेतील पाण्याच्या टाकीजवळ ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी तेजसला गाडीवर बसविले. त्याला सोनापूर रस्त्यावरील जांभळगाव माळावरील विहिरीजवळ नेले. त्या ठिकाणी त्यांनी दोरीने गळा आवळून त्याचा खून करून मृतदेह सिमेंटच्या पाइपला बांधून विहिरीत टाकला. मात्र, अपहरण प्रकरणाचा गवगवा झाल्याने संशयितांनी त्या वेळी कोणतीच हालचाल केली नाही. वातावरण शांत झाल्यानंतर त्यांनी दोन महिन्यांनी संशयितांनी खडणीसाठी फोन केला. त्यानंतर या प्रकरणाचे गूढ उलगडत गेले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com