...तर तुमच्या दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित हाेऊ शकताे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने उघडण्याची सवलत जिल्ह्यात लागू केली; परंतु सातारा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले पोवई नाका ते नगरपालिका रस्ता, नगरपालिका रस्ता ते राजवाडा, पोवई नाका ते छत्रपती शाहू स्टेडियम रस्ता, एसटी स्टॅंड ते राधिका चौक (माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्ता), पोवई नाका ते पोलिस मुख्यालय मार्गे मोती चौक हे रस्ते प्रतिबंधित आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील दुकानदारांना या आदेशाचा लाभ मिळणार नाही. या रस्त्यांबरोबर शहरातील सहा कंटेनमेंट झोनमध्येही दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे साताऱ्यातील मुख्य बाजारपेठ अद्यापही बंदच असणार आहे.
 

सातारा : चौथ्या लॉकडाउनमध्ये शासनाने दिलेल्या सुविधा सातारा शहरातील प्रमुख बाजारपेठ वगळता आज संपूर्ण जिल्ह्यात लागू केल्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे; परंतु सुरक्षित शारीरिक अंतर न राखल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. नियम न पाळणाऱ्या दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करण्याची तरतूदही आदेशात असून, तिसऱ्या परिशिष्ठानुसार जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
 
तीन दिवसांपासून राज्यात चौथा लॉकडाउन सुरू झाला आहे. त्यामध्ये नॉन रेड झोनमध्ये अनेक दुकाने व कार्यालये सुरू करण्यास शासनाने सूट दिली. त्याबाबत मंगळवारी आदेश काढले गेले. त्या आदेशाच्या अधिन राहून सातारा हा नॉन रेड झोनमध्ये असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सवलती आज जिल्ह्यात लागू केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणची सर्व दुकाने, औद्योगिक व खासगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सुरू करण्यास कोणाच्याही परवानगीची अट ठेवण्यात आलेली नाही. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत दुकाने व कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी सुरक्षित शारीरिक अंतर राखण्यासाठी कडक निर्बंधही आणण्यात आले आहेत. दुकानदाराने दुकानात दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर राहील याची काळजी घ्यावी, तसेच दुकानात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पहिल्यांदा उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागात पाचशे, तर शहरी भागात एक हजार रुपये, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास ग्रामीण भागात एक हजार, तर शहरी भागात दोन हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास ग्रामीण असो वा शहरी, संबंधित दुकानदाराचा परवाना तीन दिवस निलंबित करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागांत स्थानिक स्वराज्य संस्थांनी या आदेशाची अंमलबजावणी करायची आहे.
 
याबरोबरच अंत्यविधी व लग्न समारंभ या कार्यक्रमात 50 लोक येऊ शकतात; परंतु सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याची काळजी संयोजकाला घ्यावी लागणार आहे. क्रीडांगण, स्टेडियम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये वैयक्तिक व्यायामास परवानगी मिळाली आहे. वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत अत्यावश्‍यक बाबी वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला बंदी कायम ठेवण्यात आली आहे. 

सातारा शहरातील बाजारपेठ बंदच
 
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने उघडण्याची सवलत जिल्ह्यात लागू केली; परंतु सातारा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले पोवई नाका ते नगरपालिका रस्ता, नगरपालिका रस्ता ते राजवाडा, पोवई नाका ते छत्रपती शाहू स्टेडियम रस्ता, एसटी स्टॅंड ते राधिका चौक (माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्ता), पोवई नाका ते पोलिस मुख्यालय मार्गे मोती चौक हे रस्ते प्रतिबंधित आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील दुकानदारांना या आदेशाचा लाभ मिळणार नाही. या रस्त्यांबरोबर शहरातील सहा कंटेनमेंट झोनमध्येही दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे साताऱ्यातील मुख्य बाजारपेठ अद्यापही बंदच असणार आहे.

दरम्यान आज (शुक्रवार) सातारा शहर व परिसरात सहा कंटेनमेंट झाेन वगळून इतरत्र सर्व ठिकाणी दुकाने (मुख्य बाजारपेठ) सुरु ठेवण्याचे आदेश दुपार पर्यंत काढले जातील अशी माहिती प्रांताधिकारी मिनाझ मुल्ला यांनी दिली. त्यामुळे साताऱ्यातील मुख्य बाजारपेठ खूली हाेण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
  
 
साताऱ्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान, वाढत्या आकड्यांमुळे काळजात धस्स 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Lockdown Reilef With Special Guideliness