esakal | साताऱ्यात गणेशोत्सव खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यात गणेशोत्सव खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल

गणेशोत्सव खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने आल्याने कर्मवीर भाऊराव पाटील पथावर रविवारी तुडुंब गर्दी झाली होती. 

साताऱ्यात गणेशोत्सव खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः लाडक्‍या गणरायाचे उद्या (सोमवार) आगमन होत आहे. त्याचे स्वागत, सजावट, पूजन आणि त्यांच्या नैवद्यातही काही कमी राहू नये यासाठी खरेदीसाठी आज नागरिक मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत आल्याने साताऱ्यातील रस्ते गर्दीने ओसंडून वाहू लागले आहेत. गणेशमूर्ती ठरविण्यासाठी आजच विविध कुंभारवाड्यातून, स्टॉलवर तसेच सातारा-कोरेगाव रस्त्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात नागरिकांसह सार्वजनिक उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी झाली होती. आज घरोघरी महिलांनी उत्साहात हरितालिकांचे पूजन केले. गणेशोत्सव शांततेत व्हावा यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची जय्यत तयारी केली आहे. 

गणेशोत्सव म्हटले की आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वहात असतो. गेले काही दिवस पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारणी आणि सजावटी वेगाने केल्या. बहुतेक मंडळांच्या सजावटी आज अंतिम टप्प्यात होत्या. तर घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी गेले चार दिवस सवड मिळेल त्या प्रमाणे नागरिक घरात रंगरंगोटी करत होते. तसेच मखरे, घरातील छोटा मंडप, इतर सजावट नागरिकांची कालपासून सुरू झाली. 
काल सायंकाळी उत्सवासाठीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीने फुल्ल झाली होती. आज रविवारच्या सुटीमुळे त्यात आणखी भर पडली. राजवाडा, मोती चौक आणि कर्मवीर भाऊराव पाटील पथावर मोठी गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तुलनेत मोठ्या मूर्ती स्वस्त मिळत असल्याने गुजराती, राजस्थानी कलाकारांकडून मूर्ती घेणे पसंत करतात. त्यामुळे आज मूर्ती ठरविण्यासाठी (निश्‍चित करण्यासाठी) मंडळांच्या कार्यकर्त्यांची बॉंबे रेस्टॉरंट चौकात मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी घरगुती उत्सवासाठीही तेथे मूर्ती खरेदी करणे पसंत केले. उद्या (सोमवार) गणेश चतुर्थीस बहुतेकजण मूर्ती घरी आणतात. मात्र, काही नागरिकांनी उद्याची गर्दी टाळण्यासाठी आजच मूर्ती घरी नेणे पसंत केले. त्यामुळे कुंभारवाड्यात नागरिकांची वर्दळ वाढली होती. घरगुती गणपती नागरिक सहकुटुंब येवून घंटा, टाळ्या आणि टाळ वाजवत मोरयाचा जयघोष करत घरी नेताना आढळत होते. आज शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्ती आपल्या उत्सव मंडपाकडे नेल्या. उद्या (सोमवार) ढोलताशांच्या अव्याहत दणदणाटात गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ होणार आहे. 

मंडळांत वाढीची शक्‍यता 

दरम्यान, गेल्या वर्षी जिल्ह्यात पाच हजार 92 गणेशोत्सव मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. यावर्षी त्यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. तसेच "एक गाव, एक गणपती' उपक्रम राबविण्यात अनेक गावे हिरीरिने पुढे येत आहेत. गेल्या वर्षी 522 गावांत "एक गाव, एक गणपती' उपक्रम यशस्वीपणे राबविला होता. 

पोलिसांकडून मोठी दक्षता 

जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत व्हावा, यासाठी पोलिसांनी मोठी दक्षता घेतली आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच राज्य राखीव पोलिस दल, होमगार्डचे जवान तैनात केले जाणार आहेत. 
 गेल्या वर्षी जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे -5092 
 एक गाव, एक गणपती उपक्रम राबविलेली गावे-522 

बंदोबस्तासाठी... 
 पोलिस अधिकारी व कर्मचारी 2400 
 राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन प्लाटून 
 होमगार्ड 1500 
 

 
 

loading image
go to top