चाळकेवाडी पठारावरही फुलांचा बहर 

दीपक शिंदे
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कसे जाल - सातारा-चाळकेवाडी मार्ग 
काय पाहाल - विविधरंगी फुले, ठोसेघर धबधबा, सज्जनगड, पवनऊर्जा प्रकल्प 
राहण्याची व्यवस्था - सातारा 

परळी - निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात विविधरंगी फुलांचा बहर येतो. जागतिक वारसा यादीत पोचल्यानंतर पर्यटकांचा ओढा कास पठाराकडे अधिक आहे. पण, सातारा शहराच्या पश्‍चिमेकडे असलेले चाळकेवाडीचे पठारही आता फुलांनी बहरू लागले आहे. ठोसेघर धबधबा, पवनचक्‍क्‍या, सज्जनगड व फुलांनी आच्छादलेले चाळकेवाडी पठार असा तिहेरी आनंद पर्यटकांना घेता येईल. वेगळ्या जातीची आणि वैविध्यपूर्ण फुले फुलू लागली आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून कास पठारावर फुलांचा बहर येत होता. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. तशीच स्थिती चाळकेवाडी पठाराचीदेखील आहे. या पठारावरही विविध जातींची फुले मोठ्या प्रमाणावर फुलतात. परंतु, त्याबाबत अजूनही फारसे कोणाचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे हा परिसर कोलाहलापासून दूर आहे. तरीही अनेक पर्यटक याचा आनंद घेतात. निळ्या, पिवळ्या, लाल रंगाच्या फुलांचा हा गालिचा काश्‍मीरमधील फुलांच्या गालिचाची आठवण करून देतो. कधी ढगाळ वातावरण, कधी धुवाधार पाऊस, कधी धुके, तर क्षणात ऊन पडते. असा ऊन-पावसाचा खेळ या भागात दिवसभरात अनेकदा अनुभवण्यास मिळतो. कास पठारावर ज्या फुलांच्या प्रजाती आढळतात, तशाच प्रकारची फुले या पठारावरही पाहायला मिळतात. 

चाळकेवाडीच्या पठारावर सध्या सोनकी, सोनटिकली, करडू, लाल गोधणी, निळवंती, एक ढांगी अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती पाहायला मिळत आहेत. निसर्गरम्य ठोसेघर धबधबा, विस्तीर्ण पवनचक्‍क्‍यांचे पठार, कोयना, तारळी धरणाच्या पाण्याचा फुगवटा, दाट धुके, खळखळून वाहणारे पाण्याचे झरे, विविध प्रकारचे पक्षी, मोर यामुळे या ठिकाणी आलेले पर्यटक निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याचा आस्वाद घेतात. 

याबरोबरच या पठारावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची सीमारेषा आहे. कोयनेच्या पाण्याचा फुगवटा, पाटण व सातारा तालुक्‍याची हद्ददेखील आहे. या पठारावरील फुलांबाबतही वन विभाग, स्थानिक ग्रामस्थांनी कृती आराखडा तयार केला तर पर्यटकांना निसर्गाच्या या मनमोहक रूपाचा आनंद लुटता येईल. 

Web Title: satara news flower tourist