अकरा हजार मुली होणार ‘पॅडगर्ल’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सातारा - ग्रामीण महिला, किशोरवयीन मुलींत सॅनिटरी नॅपकिनचा वापर आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या अस्मिता योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी एक हजार ८६७ किशोरवयीन मुली, तर २५४ बचतगटांतील महिलांनी ‘अस्मिता’ला आपलेसे केले आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या ८१४ शाळांतील ११ हजार ५५६ किशोरवयीन मुली असून, त्यांना ‘पॅडगर्ल’ बनविण्याचा संकल्पच जिल्हा परिषदेने केले आहे. 

सातारा - ग्रामीण महिला, किशोरवयीन मुलींत सॅनिटरी नॅपकिनचा वापर आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या अस्मिता योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी एक हजार ८६७ किशोरवयीन मुली, तर २५४ बचतगटांतील महिलांनी ‘अस्मिता’ला आपलेसे केले आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या ८१४ शाळांतील ११ हजार ५५६ किशोरवयीन मुली असून, त्यांना ‘पॅडगर्ल’ बनविण्याचा संकल्पच जिल्हा परिषदेने केले आहे. 

ग्रामीण महिला आणि किशोरवयीन मुली व जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील मुलींसाठी अस्मिता योजना राबविली जात आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत बचतगट, किशोरवयीन मुलींना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींसाठी योजनेचे अनुदान असून, आठ नॅपकिनचे पाकीट पाच रुपयांत मिळेल. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीकडे ‘अस्मिता कार्ड’ आवश्‍यक असेल. त्यासाठी मुख्याध्यापकांनी सर्व मुलींची यादी प्रमाणित करून ग्रामपंचायतीच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात जमा करावयाची आहे.

आपले सेवा केंद्राच्या प्रमुखांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन सर्व मुलींची नोंदणी करावयाची असून, त्यासाठी शुल्क आकारायचे नाही. प्रत्येक मुलीच्या नोंदणीसाठी पाच रुपयेप्रमाणे नोंदणी शुल्क सरकार देणार आहे. 

स्वयंसहायता समूहांना ‘अस्मिता’ (ASMITA) स्वतंत्र मोबाईल ॲपच्या माध्यमातून मागणी आणि पुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. समूहाने ॲपवर एनआयसी कोड टाकायचा आहे. नोंदणीसाठी आवश्‍यक असलेला ओटीपी समूहाच्या नोंदणीकृत मोबाईलवर येऊन नोंदणी पूर्ण होईल. नॅपकिनची मागणी ॲपवर नोंदवायची आहे. त्यासंबंधीचा रिचार्ज कोणत्याही ‘आपले सरकार’ सेवा केंद्रातून अथवा क्रेडिट कार्ड, डेबीट कार्ड, रुपे कार्ड वापरून करता येईल. मागणी प्रत्येक प्रकारच्या नॅपकिनची १४० पॅकेटच्या पटीत नोंदवायची आहे. तालुकास्तरावरून वितरकाकडून हे नॅपकिन समूहाला घेता येतील. नॅपकिन मिळाल्याची नोंद ॲपवर करता येईल. त्यानंतर अकाउंटमधील रक्कम पुरवठादाराकडे वर्ग होईल. 

झेडपीतील मुलींना मोफत
जिल्हा परिषद शाळांतील मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत जनजागृती व्हावी, त्याची सवय लागावी, यासाठी जिल्हा परिषदेने एक वर्षासाठी पाच मोफत पॅड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद शिक्षण विभागाने केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

सॅनिटरी नॅपकिन विक्रीची किंमत 
लाभार्थी    नॅपकिनचा आकार (मिलिमीटरमध्ये)    ८ पॅडच्या पाकिटाची स्वयंसहायता समूहासाठी खरेदीची किंमत रुपयांमध्ये    समूहाचा नफा रुपयांमध्ये    विक्री किंमत रुपयांमध्ये 
 
ग्रामीण महिला.........२४०........... १९.२०............ ४.८०.............. २४ 

ग्रामीण महिला........ २८०........... २३.२०............ ५.८०.............. २९ 

जिल्हा परिषद शाळेतील  
किशोरवयीन मुली.... २४०.............. ४...................... १................. ५

सध्याची नोंदणी
२५४ बचतगट
१८६७ शालेय मुली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news girl padgirl asmita sanitary napkin