पायाभूत सुविधांची खंडाळ्यात वानवा 

अश्‍फाक पटेल
शनिवार, 1 जुलै 2017

खंडाळा - वाढते औद्योगिकरण व तालुका मुख्यालय असल्याने खंडाळा शहराचे वेगाने विस्तार होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाढत्या लोकवस्तीला मूळ पायाभूत सुविधा पुरवणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. मात्र, सद्यःपरिस्थितीमध्ये या पायाभूत सुविधांचा वानवा नागरिकांना सोसावा लागत आहे. 

खंडाळा - वाढते औद्योगिकरण व तालुका मुख्यालय असल्याने खंडाळा शहराचे वेगाने विस्तार होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाढत्या लोकवस्तीला मूळ पायाभूत सुविधा पुरवणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. मात्र, सद्यःपरिस्थितीमध्ये या पायाभूत सुविधांचा वानवा नागरिकांना सोसावा लागत आहे. 

शहरात सांडपाणी व्यवस्था कसलीच नाही आणि जी आहे ती मोडकळीस आलेली आहे. ड्रेनेजची सुविधा नसल्यामुळे राहत्या घरासमोर असलेल्या बोअरवेलशेजारी सांडपाणी मुरविले जाते. हेच पाणी पुन्हा बोअरवेलमधून घेतले जात असल्याची भयानक अवस्था सध्या येथे पाहायला मिळत आहे; तसेच महामार्गावरील असणाऱ्या या शहरात अनेक ‘टाउनशिप’च्या योजना आल्यामुळे लोकवस्ती वाढली. मात्र, या सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी पूरतच नाही म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जे पाणी येते तेही कमी दाबाने येत आहे. परिणामी त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी येथे नगरपंचायतीमार्फत नगरोत्थान योजना २०१७-१८ तून नवीन व अत्याधुनिक सांडपाणी व्यवस्था मंजूर व्हावी व २४ बाय ७  पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी यासंबंधी आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील व विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्याकडे निवेदन दिले असल्याचे नगराध्यक्ष शरद दोशी यांनी सांगितले. याबाबत लवकरच कारवाई व्हावी, अशी मागणी आहे.

अतिवृष्टीने खंबाटकी घाटाला नदीचे स्वरूप आले होते. हेच पाणी खंबाटकीखाली असलेल्या ओढ्या, नाल्यांत उतरले. ओढ्यांची सफाई नसल्याने राडारोडा, माती, वाळूमुळे ओढ्याला खोलीच राहिली नाही. त्याची दखल घेत येथील नगरपंचायतीने मात्र सध्या काही प्रमाणात ओढासफाई केली आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या ओढ्याने मोकळा श्वास घेतला आहे, तरीही संपूर्ण ओढ्याची सफाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवाजी चौक ते राजेंद्र विद्यालयाच्या चौकापर्यंत मोठी रहदारी असते. मात्र, येथील अपुऱ्या रस्त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्यावरील ताण कमी करण्यासाठी शहराच्या बाहेरून ‘रिंगरोड’ व्हावा, अशी मागणी पुढे येत आहे. संभाजी चौक येथे सध्या सांडपाणी व्यवस्थेचे तर तीन- तेरा वाजले असून, या सांडपाण्यासंदर्भात उत्खनन सुरू आहे. त्यातून लवकरच मार्ग काढावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: satara news khandala Infrastructure