अजून किती बळी हवेत...?

अश्‍पाक पटेल
बुधवार, 11 एप्रिल 2018

‘एस’ वळणाविषयी थोडेसे...
 बोगद्यातून २००१ मध्ये वाहतूक सुरू
 खंबाटकी बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दोन वळणे
 या वळणांवरही तीव्र उतार
 उतारामुळे वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड

खंडाळा - सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील इंग्रजी ‘एस’ आकाराचे धोकादायक वळण वारंवार जीवघेणे ठरत आहे. या ठिकाणी अक्षरशः मृत्यूचे तांडव नेहमी घडत असताना संबंधित विभाग बेशिस्तपणे वागत आहे. अजून किती बळी हवेत? अशी आर्त हाक वाहनधारकांसह प्रवाशांतून ऐकायला येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सन २००० ला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा रस्ता वर्ग करण्यात आला. त्यानंतर २००१ ला या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली. साताऱ्याहून पुण्याकडे जाताना खंबाटकी बोगदा ओलाडल्यानंतर ‘एस’ आकाराचे धोकादायक वळण तयार झाले. हे वळण म्हणजे ‘मृत्यूचा घाट’ असे समीकरणच बनले. कारण या वळणावर राजकीय नेत्यांसह अनेक सर्वसामान्यांचे बळी या वळणाने घेतले. आजअखेर शेकडो लोक अपघातात गंभीर जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले. २००९-१० ला साखरेची पोती भरून जाणाऱ्या ट्रकचा अपघात, २००३-०४ ला खासगी निमआराम बसचा अपघात असे किती तरी अपघात याच वळणावर झाले आहेत. आजही असाच अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारा टेम्पो कठड्यावर धडकला अन्‌ अठरा जणांचा मृत्यू झाला. 

खंबाटकी बोगद्यातून सध्या बाहेर पडल्यानंतर मोठी दोन वळणे आहेत. या वळणांवरही मोठा तीव्र उतार आहे. त्यानंतर इंग्रजी ‘एस’ आकाराचे मोठे तीव्र उताराचे वळण आहे. उतार असल्याने या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवता येत नाही. परिणामी या ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका घडत आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, तर गंभीर जखमींना जीवन जगणे अवघड झाले आहे. अपघात झाल्यास पोलिस, एनएचएआय, रेस्क्‍यू टीम व नागरिक तत्काळ मदतीसाठी माणुसकीच्या नात्याने धावत येतात. येथे माणुसकीचा झरा पाहायला मिळतो. मात्र, संबंधित विभागाने येणाऱ्या सर्व अडचणी सोडवून नवीन बोगद्याचे काम सुरू करावे, अशी मागणी पुढे येत आहे.

Web Title: Satara-Pune National Highway