कोण आहे ही प्राची कुलकर्णी? 

कोण आहे ही प्राची कुलकर्णी? 

सातारा - खरं तर त्यांचं सोशल मीडियावरील आयुष्मान इनमिन दोन-अडीच महिन्यांचं, पण त्यांनी साताऱ्याच्या कला प्रांतात अल्पावधीत तहलका माजवला. वैयक्तिक टीका-टिप्पणीने त्यांनी अनेकांना "घायाळ' केले. येथील रंगकर्मींना कमी दाखवण्याचा प्रयत्न झाला. ज्येष्ठ रंगकर्मींचे, जुन्या नाटकांचे संदर्भ देणाऱ्या या मुलीला प्रत्यक्षात पाहिलेला कोणीच भेटेना? प्रत्येकाच्या तोंडी एकच चर्चा "ही प्राची कुलकर्णी कोण?' काहींनी हे प्राची कुलकर्णी प्रकरण तडीस नेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर संभाव्य धोका लक्षात घेऊन या कथित "प्राची कुलकर्णी'चा अल्पश: विचाराने फेसबुकवरच रविवारी (काल) अंत झाला! 

हा सगळा प्रकार रंजक वाटत असला तरी तो वाटतो तितका साधा-सरळ नाही. त्याचे झाले असे, फेसबुकवर दोन-अडीच महिन्यांपूर्वी प्राची कुलकर्णी नावाने अकाउंट तयार झाले. या कथित प्राची कुलकर्णी मॅडम साताऱ्याच्या कला प्रांतातील व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होत्या. प्रत्येक जण त्यांच्या मित्रांमध्ये आपल्या परिचितांपैकी कोणी आहे का? समोरील व्यक्तीच्या आवडी-निवडी काय आहेत, आदी बाबी तपासत होता. कला प्रांतातील आणि त्यातही नाट्य चळवळीशी निगडित, त्यात परत आणखी कलानगरी कोल्हापूर येथील मान्यताप्राप्त नाट्य क्‍लबशी संबंधित असल्याचे दर्शविले गेल्याने अनेकांनी ही आभासी मैत्री स्वीकारली आणि त्या दिवसापासून मॅडमचा मानसिक खेळ सुरू झाला! 

या मॅडमनी विविध पोस्ट टाकून साताऱ्यातील रंगकर्मींवर टीका-टिप्पणी सुरू केली. काहींना दुय्यम दाखविण्याचे प्रयत्न झाले. नाट्य क्षेत्रातील आणि त्यातही धाडसाने विचार मांडणारी तरुणी म्हणून सुरवातीला तिचे कौतुकही झाले. पण, वैयक्तिक चॅटमध्ये या कथित प्राचीने गुण दाखवायला सुरवात केली. मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर सर्वांत जास्त गाजत असलेल्या दोन मालिकांमध्ये ठोकळे अभिनेतेच कसे चालतात, असा सवाल उपस्थित करणारी पोस्ट तिने टाकली आणि तेथेच तिचा पाय घसरला. ठराविक लोकांना टीकेचे लक्ष्य करत असताना कोणाची तरी भलावण करायची. तो कसा श्रेष्ठ, वरिष्ठ, विशिष्ट आहे, हे दाखविण्याचे प्रयत्न सुरू झाले. सोशल मीडियावरील पोस्ट "प्राची म्हणे' या नावाने संपायच्या. "जग हा रंगमंच आहे. आपण सगळे बिन मेकअपचे कलाकार,' असे तत्त्वज्ञान "प्राची म्हणे' खाली सांगितले जाई. साताऱ्यातील कलावंतांना कधी कमीपणा दाखविणारे विचार असत. या माध्यमातून कोणाची तरी तळी उचलण्याचा, प्रतिमा निर्मितीचे सुरू असलेले प्रयत्न येथील रंगकर्मींपासून दडून राहिले नाहीत. 

ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी, या उक्तीप्रमाणे रंगकर्मींनीही चॅटिंगच्या माध्यमातून संबंधिताच्या चेहऱ्यावरील "प्राची कुलकर्णी'चा मेकअप उतरविण्याचा प्रयत्न केला आणि अस्पष्ट का होईना खऱ्या चेहऱ्याचा अंदाज रंगकर्मींना येऊ लागला. 

"सायबर सेल'कडे या प्राची कुलकर्णीच्या खरेपणाची तड लावायची भाषा सुरू झाल्यानंतर काल मध्यरात्री (रविवारी) फेसबुकवरून प्राची कुलकर्णीचे अकाउंट डिलीट झाले. एका अस्वस्थ आत्म्याचा अल्पशा विचाराने सोशल मीडियावर रविवारी अंत झाला असला तरी त्या दुसऱ्या नावाने पुनर्जन्म घेतील, अशी येथील रंगकर्मींची धारणा आहे. जोवर वृत्ती जिवंत आहे, तोवर ही घाणेरडी वृत्ती नाव बदलत राहणार. स्वत:च्या मनातील घुसमट दुसऱ्याला विखारी त्रास देऊन बाहेर काढत राहणार, असा या रंगकर्मींचा पूर्वानुभव सांगतो! 

रंगकर्मी घेणार "सायबर सेल'ची मदत? 
साताऱ्यातीलच कोणी व्यक्ती या फेक अकाउंटच्या माध्यमातून रंगकर्मींना त्रास देण्याचा उद्योग करत असावी, असा कयास आहे. अर्थात अखेरची एक संधी म्हणून सर्व रंगकर्मींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधिताला दोन दिवसांत जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा त्यानंतर "सायबल सेल'ची मदत घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com