दहावी नापास मुलगा 'या' व्यवसायातून घेतोय महिना ५० हजारांच उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

सध्या लॉकडाऊनमुळे बरेच जण घरी असल्यामुळे वेळ घालवण्यासाठी बाग-बगीच्यावर लक्ष देत आहेत.

कऱ्हाड - लॉकडाऊन काळात अनेक उच्च शिक्षीतांच्या नोकऱ्या गेल्या, तर काही जण नोकरीविना घरात बसून आहेत. पण याच काळात कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील एक दहावी नापास मुलगा स्वतःच्या 'रोपवाटिका' व्यवसायातून महिन्याला जवळपास ५० हजार रुपयांचे उत्पन्न घेत आहे. 'प्रविण शाना' असं त्याचं नाव असून कराड - ओगलेवाडी रोडवर डूबल मळा इथं त्याची रोपवाटिका आहे. 

प्रविण मुळचा उत्तराखंड राज्यातील नैनितालमधील रुद्रपुरचा रहिवासी. २०१६ ला दहावी झाला. पण एक विषय गेला न् परिस्थितीमुळे त्याने नोकरीची वाट धरली. नैनिताल येथल्या एका नामांकित खाजगी कंपनीत ८ हजार रुपये महिना पगारावर रुजू झाला. वर्षभर तिथं काम केलं पण तिथे त्याचे मन रमत नव्हते. 

२०१७ साली प्रविणच्या काकांनी त्याला महाराष्ट्रात बोलवून घेतले. काकांनी सांगली जिल्ह्यातील पलुसमध्ये दहा वर्षापुर्वीच रोपवाटिकेची सुरवात केली आहे. हळू हळू चांगला जम बसवला आणि चिंचोळ्या जागेत असलेल्या रोपवाटिकेचा आज दोन एकरात विस्तार केला. तेथेच त्यांनी प्रविणला झाडांची जोपासना आणि विक्रीचे कौशल्य याविषयी दोन महिने प्रशिक्षण दिले आणि ओगलेवाडीमध्ये रोपवाटिका सुरु करण्यासाठी मदतही केली. 

प्रविणचाही दोन वर्षानंतर आज चांगला जम बसला आहे. वडील रोज सकाळी सायकलवरुन झाडं घेवून शहरात विकायला जातात. तर तो दिवसभर येणाऱ्या ग्राहंकासाठी रोपवाटिकेवर असतो. सध्या लॉकडाऊनमुळे बरेच जण घरी असल्यामुळे वेळ घालवण्यासाठी बाग-बगीच्यावर लक्ष देत आहेत. तसेच झाडे आणि शेती संबंधित कामे अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने रोपवाटिका बंदही ठेवावी लागली नसल्याचे त्याने सांगितले. 

हे पण वाचाजुनी झाडेच खरे सेलिब्रिटी : अभिनेता सयाजी शिंदे  

रोपवाटिकेत सर्व प्रकारच्या फुलांची, फळांची आणि शो साठीची झाडे असून त्यांची किंमत ५० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत आहे. दिवसभरात एक ग्राहक एका वेळी ६ ते ७ झाडं तरी सहज घेवून जातात. त्यातून दिवसाला अडीच ते तीन हजार रुपये मिळतात, असे प्रविणने सांगितले. जेव्हा त्याला त्याच्या शिक्षणाविषयी मत विचारलं तेव्हा 'पढाई का कोई वास्ता नही होता साहबं, ये चार इंच का पेट सब सिखाता है....'असं म्हणत त्याने पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहाराज्ञान माणसाला जास्त शिकवत असल्याचे सांगितले. 

संकलन - ऋषिकेश नळगुणे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara The tenth failed son is earning Rs 50 000 a month from business