रोपे कोमेजली... जाळ्या मात्र हिरव्यागार!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणात हजारो वृक्षांवर कुऱ्हाड कोसळली. त्यानंतर या रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले. रोपांच्या बाजूला संरक्षक जाळ्याही बसवण्यात आल्या. मात्र, नंतरच्या काळात पाणी न मिळाल्याने ही झाडे कोमेजून गेली आहेत. बाजूच्या जाळ्या मात्र हिरव्यागार आहेत. 

मायणी (जि. सातारा) : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचा विकास करताना शेकडो वृक्ष जमीनदोस्त झाले. रस्ते विकास धोरणांनुसार तेथे नव्याने वृक्षारोपणही करण्यात आले. मात्र, ठेकेदाराच्या दुर्लक्ष व बेफिकीरीमुळे पाण्याअभावी झाडे वाळून चालली आहेत. बाजूच्या हिरव्या संरक्षक जाळ्याच शिल्लक आहेत. आता पावसाळ्यापूर्वी नव्याने वृक्षारोपण करून रोपांचे उत्तम संगोपन करणे आवश्‍यक आहे. 

गेल्या वर्षापासून रस्ते विकासाची कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. रुंदीकरण, मजबुतीकरण व नव्याने डांबरीकरण वा कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्या कामांसाठी रस्त्याकडेची शेकडो लहान-मोठी झाडे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आधीच दुष्काळी, ओसाड माळराने असलेला भाग अधिकच उजाड झाला आहे. वाटसरूला सावली देणारे वृक्ष दृष्टीस येत नाहीत. त्यामुळे उन्हाळा अधिकच कडक व तीव्र जाणवू लागला आहे. प्रवासी वा वाटसरूंना काही काळाच्या विश्रांतीसाठी रस्त्यापासून दोन-तीनशे मीटरपर्यंत दूर जावे लागत आहे. 

शेकडो झाडे तोडून रस्ते तयार झाले. शासन धोरणांनुसार संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याकडेला वृक्षारोपणही केले. जनावरांपासून सुरक्षिततेसाठी रोपांभोवती जाळ्या उभारण्यात आल्या. मात्र, त्याचे संगोपन करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. वेळेवर व पुरेसे पाणी न दिल्यामुळे बहुतांशी रोपे वाळून गेली आहेत. झाडांच्या संरक्षणासाठी लावलेल्या प्लॅस्टिकच्या हिरव्या जाळ्यांमुळे वाळलेली झाडे दिसून येत नाहीत. पाणी देवूनही ही रोपे जीवंत होणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा रस्त्याकडेला वृक्षारोपणाचे काम हाती घेण्याची आवश्‍यकता आहे. केवळ वृक्षारोपण न करता ती सर्व झाडे जगविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराने घेतली पाहिजे. आता रस्ता प्रशस्त झाला आहे. मात्र, रस्त्याकडेला वृक्ष नसल्याने प्रवास आनंददायी वाटत नाही. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नव्याने वृक्षारोपणाचे काम हाती घेण्याची मागणी पर्यावरण व निसर्गप्रेमी करीत आहेत. 

वृक्षारोपण करणाऱ्यांनी रोपे जगविण्याची व त्याचे सर्व संगोपन करण्याची जबाबदारी पार पाडायलाच हवी. 

- दादासाहेब कचरे, पक्षी-निसर्गमित्र, मायणी 

 

दारूच्या नशेत चुलत्यावर वार; पोलिस घुसले शिवारात पण...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The trees along the road burned