विहिरीच्या दुरुस्तीतून दाखवली "पाटीलकी'

corona
corona

मेढा (जि. सातारा) : ओझरे येथील 125 जणांच्या पाटील कुटुंबाने लॉकडाउनच्या काळात श्रमदानातून विहिरीची दुरुस्ती केली. पाणीटंचाईच्या काळात गाळ काढण्यापासून ते बांधकामापर्यंत काम करून या कुटुंबाने सुमारे एक लाख रुपयांची बचत केली. पाटील कुटुंबातील युवक, महिला व ज्येष्ठांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

ओझरेतील 20 कुटुंबांचे पाटील घराणे आहे. या घराण्यात जवळपास 125 सदस्य आहेत. या कुटुंबाची 30 फूट खोल व 20 फूट व्यासाची पुरातन शेतविहीर आहे. ही विहीर "पाटलांची विहीर' म्हणून ओळखली जाते. या विहिरीतील पाण्याचा पाचवी पिढी लाभ घेत आहे. या पाण्यातून काही वर्षांपूर्वी बागायती शेती केली जात होती. परंतु, ही विहीर गाळाने भरून गेल्याने नैसर्गिक स्रोत बंद झाले. विहिरीची मोठ्या प्रमाणात पडझडही झाली होती. यापूर्वी 1972 च्या दुष्काळात विहिरीतील गाळ काढला होता. 

सध्या कोरोनामुळे मुंबईस्थित पाटील कुटुंबातील युवक गावी आले होते. लॉकडाउनमुळे सर्वजण घरातच बसून होते. सोशल डिस्टन्सिंग पाळून आपल्याला काय करता येईल, या विचारात सर्वजण होते. या संधीचा फायदा घेत मोडकळीस आलेली व गाळाने भरलेली विहीर दुरुस्त करण्याचा मनोदय सर्वांनी व्यक्त केला. ज्येष्ठांचे मार्गदर्शन व युवकांचे श्रम एकत्र आले अन्‌ काम सुरू झाले. यारीचा वापर न करता सात दिवस श्रमदान करून साधारणपणे पाच ते आठ फुटांचा गाळ काढला गेला. पाण्याचे नैसर्गिक स्रोत मोकळे झाले. विहीर पाण्याने भरू लागली. त्यानंतर विहिरीभोवती चार फूट उंचीचा संरक्षक कठड्याचे बांधकाम केले गेले. जवळपास एक लाख रुपयांचे हे काम झाले. गवंडी, सिमेंट, ग्रीड यासाठी 15 हजार रुपये खर्च झाला. किती पैसे गेले व किती वाचवले, हे महत्त्वाचे नाही तर सर्वजण एकत्र आले, हे चित्र आशादायी आहे. 

लॉकडाउनच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळून युवकांची शक्ती अशा विधायक कामासाठी एकत्र आली तर खेड्यांचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आज या युवकांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर अनेक चांगली कामे उभी राहू शकतील. 

- अशोक लकडे (गुरुजी), समाजसेवक, ओझरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com