esakal | सावली केंद्र कोरोनामुक्त; 63 लोकांनी केली शांतपणे मात 
sakal

बोलून बातमी शोधा

savali center

14 दिवसांत 63 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 

सावली केंद्र कोरोनामुक्त; 63 लोकांनी केली शांतपणे मात 

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली ः कोरोना म्हणजे भय... कोरोना म्हणजे मरण... कोरोना म्हणजे संपलं सारं... अशा भितीचा बाजार एकीकडे भरला असताना कुठल्या मोठ्या रुग्णालयात दाखल न होता... फार हाय-फाय उपचार न घेता... केवळ अन्‌ केवळ उत्तम आहार, वेळेवर औषधे आणि बिनधास्तपणा या जोरावर जागतिक रोगावर सहज मात करता येऊ शकते, हे उदाहरण शहाण्यांच्या गर्दीत वेड्या ठरवल्या गेलेल्या, दुर्बल, उपेक्षित आणि असहाय्य, बेघर लोकांनी घालून दिले आहे. "सावली निवारा केंद्र' असे नाव असलेल्या एका शाळा इमारतीतील केंद्राने कोरोनाचा मुकाबला शांतपणे करत धास्तावलेल्या लोकांना उत्तर दिलं आहे. 14 दिवसांत 63 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 

उत्तर शिवाजीनगर येथील शाळा नंबर 8 मधील सावली निवारा केंद्र बेघरांसाठीचा हक्काचा निवारा. इथे अगदी कुटुंबाप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. 10 जुलै रोजी इथल्या निवारा केंद्रावर एकास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसात तेथील 63 जणांना बाधा झाली. प्रशासनाचे धाबे दणाणले आणि सांगलीकरांची नजर या केंद्रकडे लागली. प्रशासनाने तातडीने खबरदारी आणि उपाययोजना केल्या. 14 दिवसानंतर हे निवारा केंद्र कोरोनामुक्त झाले. एकही जिवीतहानी न होता हे केंद्र कोरोनामुक्त झाले. 

सांगलीसह महापालिका क्षेत्रात फिरणाऱ्या बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी इन्साफ फौंडेशन गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे. केंद्र शासनाच्या दिनदयाळ अंत्योदय नागरीक उपजिवीका अभियानांतर्गत महापालिका आणि इन्साफ फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षांपासून निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. इन्साफ फौंडेशनचे संस्थापक मुस्तफा मुजावर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र चालविले जाते. याठिकाणी आतापर्यंत शहरातील सर्व बेघरांना हक्काचा निवारा देण्यात आला आहे. काहींच्या कुटुंबियांचा शोध घेवून त्यांना परत पाठविण्यात आले. सद्यस्थितीत याठिकाणी 56 जण राहतात. अनेकजण व्याधीत्रस्त आहेत. त्याच्यावर त्याचठिकाणी उपचार केले जातात. 
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढ असतानाच 10 जुलै रोजी केंद्रातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने इथल्या साऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले.

दुसऱ्याच दिवशी तब्बल 63 जणांना बाधा झाली. त्यामध्ये 7 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. साऱ्यांवर तेथेच उपचार करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील यांनी आरोग्य यंत्रणेला तेथे नेमले. पौष्टिक आहार आणि औषध फवारणी, औषधोपचार, स्वच्छता याकडे कटाक्षाने लक्ष दिले गेले. पूर्ण कालावधीत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण होता. रुग्णांसह साऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील दररोज हजेरी लावायच्या. 14 दिवसानंतर इथले सारेच कोरोनामुक्त झाले आणि प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडला. 

 

""सावली निवारा केंद्रावर पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्याठिकाणी उपचार करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासून साऱ्यांचीच प्रकृती ठणठणीत होती. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला, त्यामुळेच आम्ही कोरोनामुक्त झालो.'' 
- मुस्तफा मुजावर, 
संस्थापक, 
इन्साफ फौंडेशन, सांगली 

 

loading image