‘सावित्री सृष्टी’साठी हवी कल्पक दृष्टी

‘सावित्री सृष्टी’साठी हवी कल्पक दृष्टी

खंडाळा - अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजासाठी मातीच्या धुळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत ज्ञानी बनविण्याचा निर्धार करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे ‘सावित्री सृष्टी’ उभारण्यासाठी दृष्टी आवश्‍यक आहे. ते कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्‍वासक नेतृत्वाकडून व्हावे, अशी अपेक्षा ज्ञानप्रेमींकडून व्यक्‍त होत आहे. 

स्त्री शिक्षणाच्या जनक, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने उद्या (गुरुवारी) नायगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्री, मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. त्यानिमित्त विविध मागण्यांची पूर्तता करून राज्य सरकारने सावित्रीबाईंच्या कार्याचा उचित गौरव करावा, अशी अपेक्षा स्थानिक जनतेतून व्यक्‍त होत आहे. 

शिक्षण व सामाजिक कार्याबाबत आदर्श निर्माण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी महिलांसाठी अद्ययावत असे महिला विद्यापीठ व्हावे व येथील अभ्यासकेंद्र विद्यापीठामार्फत सुरू करावे. तसेच सध्या सर्वत्र महापुरुषांची भव्यदिव्य स्मारके उभी राहत असताना, नायगाव येथेही सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याबरोबर त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ आकर्षक सावित्री सृष्टी प्रकल्प उभारावा. जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे पर्यटन निवास बांधण्यात आले असले तरी, त्याकडे जाणारा रस्ता व इतर कामे लवकर पूर्ण करून हे निवास पर्यटकांसाठी व अभ्यासकांसाठी लवकरच खुले करावे. महिलांसाठी आयटीआय व मेडिकल कॉलेजसाठीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. तो देखील लवकर मार्गी लावावा आणि नायगावलगतच्या केसुर्डीत प्रस्तावित असलेल्या न्यायभवनाचे काम सुरू व्हावे. या ठिकाणी एखादे महिला कौशल्य विकास केंद्र सुरू करावे. गाव विकास आराखड्यातील अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांकडून केल्या आहेत. 

दरम्यान, आजअखेर झालेले स्मारकाचे काम, शिल्पसृष्टी, पायाभूत सुविधांची पूर्तता, विद्युत रोषणाई, मुलींचे अध्यापक विद्यालय, पर्यटन निवास व इतर झालेल्या विकासकामांबद्दलही समाधान व्यक्त करण्यात आले आहे. मात्र, सध्या शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या बदलांची दखल घेत, येथेही महिला विद्यापीठ, कॉलेज, सावित्री सृष्टी प्रकल्प, पर्यटनाचा ‘ब’ दर्जा व इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून होत आहे. 

‘ब’ वर्गाचा दर्जा द्या...
सध्या ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित असलेल्या नायगावला वर्षभर अनेक पर्यटक भेट देतात. पण, त्यांना पायाभूत सुविधा पुरविताना यंत्रणेवर ताण येतो. त्यामुळे या स्मारकास ‘ब’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नसून, जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्याला मूर्तस्वरूप यावे, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com