जिल्ह्यातील शाळा 15 ऑक्‍टोबरपर्यंत तंबाखुमुक्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जिल्हा परिषदेचा प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्यावतीने आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये तंबाखुमुक्तीची कार्यशाळा आयोजित केली होती.

सोलापूर - शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक गुणवत्ता वाढवावी. तंबाखुमुक्तीची शपथ घेण्यापेक्षा विचाराला महत्त्व देऊन काम केल्यास येत्या 15 ऑक्‍टोबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा तंबाखुमुक्त होतील, असा विश्‍वास प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी व्यक्त केला. 

जिल्हा परिषदेचा प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्यावतीने आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये तंबाखुमुक्तीची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. राठोड बोलत होते. यावेळी माध्यमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी रमेश जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अणदूरकर, सलाम फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक निर्झर बरवे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हेमंत बंगाळे, विस्तार अधिकारी बापूराव जमादार, डॉ. अनंत गायकवाड, जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सल्लागार डॉ. स्वप्नील गायकवाड, अन्न व औषध प्रशासन अधिकारी बी. व्ही. पाटील, सुनील कोषंधर उपस्थित होते. 

श्री. निर्झर म्हणाले, देशात महाराष्ट्रासह सात राज्यात तंबाखुमुक्तीची चळवळ सलाम फाउंडेशनच्या माध्यमातून राबविली जात आहे. देशात दरवर्षी अडीच हजार लोकांचा मृत्यू तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होत आहे. यात 15 टक्के किशोरवयीन मुलांचे प्रमाण आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयातून ही चळवळ उभी केली आहे. विद्यार्थ्यांना योग्यवेळी चांगले संस्कार मिळणे गरजेचे आहे. विस्तार अधिकारी जयश्री सुतार यांनी सूत्रसंचालन केले. बापूराव जमादार यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी उपस्थित होते. 

तर ते शिक्षकांचे अपयश -
आपल्या शाळेतील विद्यार्थी जर व्यसनी होत असतील त्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे ते मोठे अपयश आहे. कारण शिक्षक हा माणसं घडविणारा पेशा आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवणे गरजेचे असल्याचेही श्री. राठोड यांनी सांगितले. 

'सकाळ'ने दिले व्यापक स्वरूप -
तंबाखुमुक्त शाळा अभियानाला 'सकाळ' माध्यम समूहाने व्यापक स्वरूप दिले आहे. 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती परीपाठाच्यावेळी विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे आवाहन श्री. निर्झर यांनी यावेळी केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School are in the district will be tobacco free till october fifteen