
बेळगाव : शाळांच्या वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती
बेळगाव - प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षात धोकादायक बनलेल्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त येत होती. याची दखल घेत बेळगाव जिल्ह्यातील विविध शाळांच्या वर्गखोल्यांचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करुन दिले जात आहे.
सध्या बेळगाव जिल्ह्यातील १,४१६ वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील धोकादायक वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण खात्याकडे केली होती. २०१९ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक शाळांमधील वर्गखोल्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर शिक्षण खात्याने जिल्ह्यातील सर्व शाळा इमारतींचा अहवाल देण्याची सूचना केली होती. त्याद्वारे जुनी इमारत पाडवून नवीन इमारत बांधणे, वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करणे आदी कामे हाती घेण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, अनेक कामे अपूर्ण स्थितीत ठेवण्यात आली आहेत. बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील धोकादायक बनलेल्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पावसाळ्यात दुरुस्तीची कामे करण्यास अडचण येणार आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ४५७ तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ९५९ वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. वर्गखोल्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी गळती होते. त्यामुळे गेल्यावर्षी काही शाळा समुदाय भवन व इतर ठिकाणी भरविण्यात आल्या होत्या. शिक्षण खात्याने शाळांच्या दुरुस्तीसाठीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याकडे व जिल्हा पंचायतीकडे दिला आहे. परंतु, त्याबाबत अनेक महिने कोणत्याही प्रकारच्या हालचाली करण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र, आता उशिरा अनुदान उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला तरी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.
Web Title: School Classroom Will Be Repaired Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..