स्वावलंबी जगण्यासाठीच्या शिक्षणाचे शाळेत धडे; "कॉज टू कनेक्‍ट'चा उपक्रम

जयसिंग कुंभार
Sunday, 4 October 2020

मुलाला नानाविध अशी कौशल्ये शिकविण्याचा प्रयत्न सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील 11 शाळांमध्ये गेली तीन वर्षे सुरू आहे. या शाळांमधील सुमारे एक हजार 200 मुले या बहुविध कौशल्य अभ्यासक्रमात सहभागी झाले आहेत. 

सांगली : एखादं मूल दहावीत जाईपर्यंत जीवनोपयोगी असं कोणतं कौशल्य शिकतं, यावर बऱ्याचदा शैक्षणिक चर्चा-परिसंवाद मोठा खल होत असतो. मात्र, या प्रश्‍नाला थेट भिडून मुलाला नानाविध अशी कौशल्ये शिकविण्याचा प्रयत्न सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील 11 शाळांमध्ये गेली तीन वर्षे सुरू आहे. या शाळांमधील सुमारे एक हजार 200 मुले या बहुविध कौशल्य अभ्यासक्रमात सहभागी झाले आहेत. 

नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकसित शिक्षण प्रक्रियेचा आग्रह धरण्यात आला. मात्र, हे करायचं कसं हा प्रश्‍न शेवटी उरतो. पुण्याच्या "कॉज टू कनेक्‍ट फाउंडेशन' या संस्थेने तीन वर्षांपूर्वी हा प्रयत्न सुरू केला. "स्कील ऑन व्हील' असं या उपक्रमाचं नाव. यात यंत्रसामग्री, साधनांसह सुसज्ज गाडी दर आठवड्यात शाळेच्या आवारात जाते. गाडीबरोबरचे तज्ज्ञ प्रशिक्षक मुलांना प्रामुख्याने अभियांत्रिकी, इलेक्‍ट्रिकल, शेती आणि अन्न प्रक्रिया अशा चार प्रमुख क्षेत्रांमधील नानाविध अभ्यासक्रमांचं थेट प्रशिक्षण मुलांना आवडीनुसार देतात. तेरा ते चौदा वयोगटातील ही मुले दोन ते तीन वर्षांत ही कौशल्ये आत्मसात करतात. भावी आयुष्यातील त्या-त्या विद्याशाखेतील शिक्षणाची दिशाही त्यातून स्पष्ट होते. 

गेल्या तीन वर्षांत सुमारे एक हजार 200 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न झाला आहे. नवकृष्णा व्हॅलीच्या इंग्रजी-मराठी माध्यम शाळा, विश्रामबाग विद्यालय (वारणाली, कुपवाड), बुधगाव हायस्कूल, ब्रिलियंट स्कूल (शिरोळ), टाकळी बोलवाड हायस्कूल, महालक्ष्मी हायस्कूल (देशिंग), गोसलिया हायस्कूल (माधवनगर), बापूसाहेब पाटील विद्यालय (अंकलखोप) या शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचे यश म्हणून शाळांमध्ये बागकाम सुरू झाले. भाजीपाला लागवड करण्यात आली. ही मुले घरकामापासून अनेक गोष्टी आवडीने करू लागली.

एकूण शिक्षण आनंददायी करण्याचा हा प्रयत्न आहे. संस्थेने या उपक्रमांबरोबरच गरीब, कष्टकरी कुटुंबातील मुलांना थेट जीवनोपयोगी कौशल्ये शिकविण्यासाठी "हुनर' नावाने आणखी एक उपक्रम राबविला. या उपक्रमात मुलांना गवंडीकाम, वेल्डिंग या कामांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. त्यातून मुले आठवड्यातून काही दिवस काम करून थोडीफार कमाईही करतात. सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात कष्टकरी कुटुंबांमधील या मुलांनी कौशल्यातून आपल्या कुटुंबासाठी हातभार लावल्याची अनेक उदाहरणे आहेत. या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याचा प्रयत्न म्हणजेच "स्कील ऑन व्हील्स' ही योजना आहे. 

भावी शिक्षणाला दिशा मिळावी
स्कील ऑन व्हील्स उपक्रमास शाळा-विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे, यंदा आम्ही सांगली जिल्ह्यातील आणखी सहा शाळांमध्ये उपक्रम सुरू करीत आहोत. मुलांमध्ये श्रमाबद्दलची प्रतिष्ठा तयार झाली पाहिजे. त्यांनी जे शिक्षण घेतले आहे, त्यातून भावी शिक्षणाला दिशा मिळावी. कुटुंबालाही हातभार लागावा, अशी अपेक्षा आहे. 
- अनिरुद्ध बनसोड, संस्थापक, कॉज टू कनेक्‍ट फाउंडेशन 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School lessons for self-reliant living; The Cause to Connect initiative