सातार्‍याच्‍या वसंत साबळेंना दुसर्‍यांदा राष्ट्रपती पोलिस पदक 

Vasant Sabale
Vasant Sabale

कोरेगाव (जि. सातारा ) : कोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक वसंत साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळवणारे ते राज्यातील तसेच जिल्हा पोलिस दलातील एकमेव पोलिस कर्मचारी आहेत. 

वसंत साबळे यांचे मूळ गाव वडूथ (ता. सातारा) असून ते सन 1984 मध्ये पोलिस दलात भरती झाले. आजपर्यंतच्या 36 वर्षांच्या कालावधीत त्यांनी खंडाळा, फलटण, कऱ्हाड, सातारा येथे सेवा बजावली आहे. सध्या ते कोरेगाव पोलिस ठाण्यामध्ये पोलिस निरीक्षक सुनिल गोडसे यांच्याकडे सहायक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंतच्या सेवा काळात श्री. साबळे यांनी फलटण येथील गुंड कानिफ घोलप याच्यावरील खुनी हल्ला, कऱ्हाड येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण व खून प्रकरण, बोगस पत्रकार झपाटे- पाटोळे प्रकरण, पैलवान संजय पाटील यांच्यावरील गोळीबार खून खटला, वाईचा गाजलेला खून खटला, मांढरदेव दुर्घटना चौकशी, सातारा व कोरेगाव येथील महत्त्वाचे गुन्हे, सोनगावच्या शेतात जप्त केलेला लाखोंचा गांजा, याशिवाय कोट्यवधींची अपहार प्रकरणे, अवैध पिस्टलची (रिव्हॉल्वर) जप्ती, कोरेगाव व पळशी येथील अफरातफरींचे गुन्हे, दरोडे, चोरी अशा शेकडो गंभीर, क्‍लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचे तपास तसेच विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना न्यायालयातील कामकाजात आवश्‍यक माहिती पुरवण्याचे काम त्यांनी केले आहे. 

त्यांनी तपास केलेल्या विविध गुन्ह्यांतील अनेक आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याबद्दल श्री. साबळे यांना आतापर्यंत 550 पेक्षा जादा रिवॉर्ड, सन्मानपत्रे मिळाली आहेत. त्यांच्या बक्षिसांची रक्कमही लाखापेक्षा अधिक आहे. यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे राष्ट्रपती पदक, दोन जादा वेतनवाढी, गुन्हे तपासाच्या कौशल्यासाठी तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी गौरवले आहे. या वर्षी देशातील निवडक 25 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, त्यात या वर्षी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळवणारे वसंत साबळे हे राज्यातील एकमेव पोलिस कर्मचारी ठरले आहेत. 

त्याबद्दल त्यांचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्‍त अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, सुहास गरुड, पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, बी.आर. पाटील, संभाजी पाटील, बाजीराव भोसले, महादेव गावडे, राजेंद्र मोहिते, रंगराव कामिरे, राजीव मुठाणे, नानासाहेब पन्हाळकर, रविंद्र पिसाळ यांच्यासह पोलिस कर्मचारी तसेच मॅरेथॉन, जलतरण ग्रुप व वडूथ ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. 

क्रीडा क्षेत्रातही चमकदार 

वसंत साबळे यांनी आतापर्यंत कबड्डी, व्हॉलीबॉल, स्विमिंग व रनिंगमध्ये भाग घेतला असून, ते विविध स्पर्धांचेही नियोजन करत असतात. त्यांनी 21 किलोमीटर मॅरेथॉन तसेच व्हॉलीबॉल, सिंधुदूर्ग सागरी जलतरण स्पर्धा तसेच गोंदिया, अमरावती व तेलंगणा येथे झालेल्या खुल्या जलतरण स्पर्धेत आणि गोव्यापासून मुंबईपर्यंतच्या मॅरेथॉन स्पर्धेत अनेक बक्षिसे, स्मृतिचिन्हे, पदके मिळवली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com