डिलेव्हरी बॉय निघाला अटल चोर; केल्‍या 40 घरफोड्या

Delivery Boy Leaves The Thief
Delivery Boy Leaves The Thief

सातारा : शहरामध्ये स्विगी या खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीमध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्याने 2017 पासून तब्बल 40 घरफोड्या केल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणला आहे. त्यांनी संशयिताकडून सुमारे 20 लाख रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने व महागड्या वस्तू जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने एकट्यानेच या सर्व घरफोड्या केल्या आहेत. 

विजय सताप्पा ढोणे (वय 29, सध्या रा. देगाव फाटा, सातारा, मूळ रा. बिदर, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अधीक्षक सातपुते म्हणाल्या, ""संशयित विजय ढोणे हा गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यात वास्तव्य करत आहे. सातारा शहरासह उपनगरामध्ये घरफोडींचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत होते.

या पार्श्‍वभूमीवर सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सतर्क राहण्याचे व संशयितांना शोधण्याचे निर्देश दिले होते. या प्रयत्नात असलेल्या एलसीबीच्या एका पथकाला ढोणेबाबत माहिती मिळाली. पथकाने त्याच्या हालचालीवर पाळत ठेवली. योग्य माहिती मिळाल्यावर त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मात्र, संपूर्ण पोलिस दल आवाक झाले. 

तो गेल्या काही महिन्यांपासून स्विगी कंपनीत फूड डिलेव्हरी बॉयचे काम पाहात आहे. त्याच्याकडे हेलमेट व डिलेव्हरी बॉयचा गणवेश नेहमी अंगावर असतो. त्यामुळे कोणालाही संशय न येता तो कोणत्याही अपार्टमेंट व परिसरात बिनधास्त वावरायचा. त्यातून तो चोरीसाठी घर हेरायचा. 2017 पासून त्याने सातारा शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचा सपाटाच लावलेला होता. 

लक्ष्मीनगर, एमआयडीसी, गोडोली यासह ठिकठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. घरफोड्यांमधून त्याने सोने, चांदीचा सुमारे 16 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये राणीहार, गंठण, मिनी गंठण, नेकलेस, सोन्याची चेन, कानातील फुले, पैंजण, चांदीच्या देवाच्या मूर्ती याचा समावेश आहे. त्याबरोबर त्याच्याकडून लॅपटॉप, डिजिटल व रोल कॅमेरा, घड्याळे, आर्टिफिशिअल दागिने असा 4 लाख रुपयांचा महागडा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.''

2017 पासून ते जानेवारी 2020 पर्यंत एकूण 40 घरफोड्यांची कबुली दिली आहे. त्यापैकी 19 घरफोड्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या आहेत. 21 घरफोड्या दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्यांच्या घरात या कालावधीत लहान - मोठी चोरी झाली असेल त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक सातपुते यांनी केले आहे. 

अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलिस हवालदार ज्योतिराम बर्गे, तानाजी माने, कांतिलाल नवघणे, संतोष पवार, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, नीलेश काटकर, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, विजय सावंत, अनू सणस, तनुजा शेख, ज्योती गोळे, प्रीती पोतेकर, नूतन बोडरे हे या कारवाईत सहभागी होते. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com