सात साखर कारखान्यांवर जप्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

कोल्हापूर - उसाच्या एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांची साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, तर चौदा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

जप्ती आदेशामध्ये दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणानगर), पंचगंगा (इचलकरंजी), गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी), इको केन (म्हाळुंगे) व जवाहर (हुपरी) या कारखान्यांचा समावेश आहे. 

कोल्हापूर - उसाच्या एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांची साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, तर चौदा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

जप्ती आदेशामध्ये दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणानगर), पंचगंगा (इचलकरंजी), गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी), इको केन (म्हाळुंगे) व जवाहर (हुपरी) या कारखान्यांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील २१ कारखान्यांनी ९५७ कोटी ४१ लाख १६ हजार रुपये थकवले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या या आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला हे आदेश मिळाले असून, ज्या-त्या तालुक्‍यातील तहसीलदारांकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे.  

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत. यामध्ये २३ कारखान्यांना कारणे दाखवा तर १२ कारखान्यांवर साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि आवश्‍यकतेप्रमाणे कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून आणि त्याची विक्री करून उसाची एफआरपी देण्याचे आदेश साखर आयुक्त गायकवाड यांनी दिले. दरम्यान, चौदा दिवसांनंतर १५ टक्के व्याजही द्यावे, अशा सूचनाही आहेत.

आजरा, अप्पासाहेब नलवडे (गडहिंग्लज), भोगावती (परिते), छत्रपती राजाराम (कसबा बावडा), छत्रपती शाहू (कागल), डॉ. डी. वाय. पाटील (वेसरफतर्फे पळसंबे), दालमिया भारत शुगर (आसुर्ले-पोर्ले), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री), अथणी शुगर (तांबाळे), कुंभी-कासारी (कुडित्रे), रियाबल शुगर महाडिक (फराळे), ओलम शुगर (हेमरस, राजगोळी खुर्द), सदाशिवराव मंडलिक (हमिदवाडा) व उदयसिंह गायकवाड (सोनवडे-बांबवडे) या कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, शुक्रवारी (ता. १) पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयामध्ये सुनावणी होणार आहे. योग्य कारण न दिल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे. 

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील विश्‍वासराव नाईक (शिराळा), केन ॲग्रो (रायगाव), निनाईदेवी-दालमिया (कोकरूड), श्री महांकाली (कवठेमहांकाळ), दत्त इंडिया (सांगली) या कारखान्यांवर जप्ती आदेश दिले आहेत. उदगिरी शुगर (बामणी), सोनहिरा (वांगी), सदगुरू शुगर्स (राजेवाडी), राजारामबापू पाटील युनिट २ (वाटेगाव सुरूल), सर्वोदय (कारंदवाडी), राजारामबापू पाटील युनिट १ (राजारामनगर, साखराळे), मोहनराव शिंदे (आरग), क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड (कुंडल) व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (वाळवा) या कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारखान्यांची सुनावणीही शनिवारी होणार आहे.

एफआरपी देण्याबाबत साखर कारखान्यांना सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत एफआरपीपोटी सुमारे दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत.  येत्या १५ दिवसांत सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक एफआरपी मिळेल. कारखान्यांना आर्थिक अडचण आहे; परंतु जादा दिवस एफआरपी थकविणे योग्य नाही.
- शेखर गायकवाड,
साखर आयुक्‍त

जप्तीचे आदेश झालेले कारखाने (रक्‍कम रुपयात)
दत्त (शिरोळ)     २४ कोटी ३६ लाख ४६ हजार    
संताजी घोरपडे (बेलेवाडी)     ५७ कोटी ८९ लाख १६ हजार 
वारणा (वारणानगर)     ११६ कोटी २ लाख ८ हजार 
पंचगंगा (इचलकरंजी)     ७४ कोटी ३९ लाख ६ हजार 
गुरुदत्त शुगर्स (टाकळवाडी)     ५८ कोटी ५६ लाख 
इको केन (म्हाळुंगे)     १७ कोटी २० लाख १९ हजार 
जवाहर (हुपरी)     ३७ कोटी ४७ लाख १५ हजार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seize on seven sugar factories