
जगामध्ये पहिल्यांदाच मोठा उपक्रम हाती घेतला आहे.
सांगली : डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम या कलाम कुटुंबीयानी चालविलेल्या संस्थेतर्फे एक हजार विद्यार्थ्यांकडून शंभर लघुग्रह तयार करून घेऊन अवकाशात सोडले जाणार आहेत. तो जागतिक विक्रम ठरणार आहे. या उपक्रमात राज्यातील 354 विद्यार्थी सहभागी होणार असून त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील दहा विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी, विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच "स्पेस टेक्नॉलाजी' बद्दल जिज्ञासा निर्माण करण्यासाठी जगामध्ये पहिल्यांदाच मोठा उपक्रम हाती घेतला आहे. "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूबस चॅलेंज 2021' असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमाची "गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड', "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड', "आशिया बुक ऑफ रेकॉर्ड', "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. देशातून एक हजार विद्यार्थ्यांकडून 100 लघुउपग्रह तयार करवून घेऊन अवकाशात सोडले जातील.
हेही वाचा- केंद्राकडून शिष्यवृत्तीसाठी 59 हजार कोटींची तरतूद: सुनिल कांबळे -
उपक्रमात महाराष्ट्रातून 354 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यापैकी 202 विद्यार्थ्यांकडून 10 हजार रुपये शुल्क भरून घेतले आहे. तर 152 विद्यार्थी "मार्टीन ग्रुप' च्या सहकार्याने विनाशुल्क सहभागी झाली आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातून 10 विद्यार्थी मोफत सहभागी झाले आहेत. त्यांची नावे लखन हाक्के, ओंकार मगदूम, किशोरी मादीग, प्रतीक्षा मुडशी, योगेश कुरवलकर, दर्शन बुरांडे, साकिब सय्यद, समीर शेख, विजय हिरेमठ, राजू भंडारे अशी आहेत. तर त्यांना शिक्षिका कल्पना माळी, विशाल भांडवे, अनिता पाटील, अशोक उंबरे, अश्विनी माळी, शैलजा कोरे, फराहसुलताना कुरेशी, नजमा मारुफ, संतोष पाटील व मांतेश कांबळे मार्गदर्शन करत आहेत. कलाम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक दिनकर आदाटे नेतृत्व करत आहेत. महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी हणमंत बिराजदार व सतीश कांबळे सहकार्य घेत आहेत. राष्ट्रीय पातळीवरून संस्थेचे सचिव मिलिंद चौधरी आणि राज्य समन्वयक मनीषा चौधरी नेतृत्व करीत आहेत.
काय आहे हा लघुउपग्रह...
हा उपग्रह जगात सर्वात कमी वजनाचा असेल. त्याचे वजन साधारण 25 ते 80 ग्रॅम असेल. असे 100 उपग्रह एकावेळी रामेश्वरम मधून हेलियन बलूनद्वारे प्रक्षेपित करून ते 35000 ते 38000 मीटर उंच अवकाशात स्थिर करण्यात येतील. वातावरणातील बदल, सूर्याची अतिनील किरणे, अवकाशातील होणारे बदल, ओझोनच्या थराचा अभ्यास आदी निरीक्षक मुले अनुभवणार आहेत.
संपादन- अर्चना बनगे