चंद्रकांत गुडेवारांना परत पाठवा; सांगली जिल्हा परिषद सभेत सदस्यांचा गदारोळ

अजित झळके
Saturday, 23 January 2021

जो ठराव झालाच नाही, त्याच्या आधारे जिल्हा परिषदेच्या बरखास्तीचा ठराव पाठवल्याचा आरोप करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना आज जिल्हा परिषद सदस्यांनी घेरले.

सांगली : जो ठराव झालाच नाही, त्याच्या आधारे जिल्हा परिषदेच्या बरखास्तीचा ठराव पाठवल्याचा आरोप करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना आज जिल्हा परिषद सदस्यांनी घेरले. गुडेवार यांना शासनाने परत बोलवून घ्यावे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, त्यांना चालू सभागृहात बाहेर जायला सांगावे, चुकीच्या ठरावाबद्दल माफी मागावी, या मुद्द्यांवर सर्वसाधारण सभेत दोन तास प्रचंड गदारोळ झाला. पीठासनासमोर जात सदस्यांनी गुडेवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. त्यात महिला सदस्यही आक्रमक झाल्या.

वसंतदादा पाटील सभागृहात अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी, सुनीता पवार, आशा पाटील, सीईओ जितेंद्र डुडी, अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे पीठासनावर होते. "जिल्हा परिषदेतील कामाचा ठेका देताना सदस्यांच्या शिफारशीने द्यावा', असा ठराव 26 ऑक्‍टोबर 2020 च्या सभेतील प्रोसेडिंगमध्ये नोंदवला गेला होता. त्या ठरावावरून गदारोळातच सभा सुऐ झाली. त्याआधी सदस्यांनी मुख्य इमारतीच्या पायरीवर बसून अधिकाऱ्यांच्या मनमानीचा निषेध नोंदवला. सभेत जितेंद्र पाटील यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले आणि तेथून फटाक्‍यांची माळ लागावी, अशा फैरी झडल्या. 

सदस्य डी. के. पाटील, सुहास बाबर, सभापती प्रमोद शेंडगे, संभाजी कचरे, सुरेंद्र वाळवेकर, सरदार पाटील, तम्मनगौडा रविपाटील, नितीन नवले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. राहुल गावडे यांनी हा ठराव नोंदवलाच का? असा सवाल करत त्यांनी चूक मान्य करण्याची मागणी केली. त्यांनी ही चूक नव्हती, ठरावासाठी सदस्यांचा खूप आग्रह होता, त्यामुळे ठराव नोंदवला आणि अध्यक्षांपुढे सादर केला, अशी सावध भूमिका त्यांनी घेतली. आक्रमक सदस्यांनी तोंडाला काळे फासण्याची भाषा केल्यावर गावडे हेही आक्रमक झाले. त्यावेळी बाचाबाची झाली. 

जितेंद्र पाटील म्हणाले,""ठराव नोंदवणे, त्यावर बरखास्तीचा प्रस्ताव मांडणे हे कृत्य म्हणजे आम्हा सदस्यांविरुद्धचे षडयंत्र होते. त्यात साठ सदस्यांची बदनामी झाली. आम्ही न्यायालयात शंभर कोटींचा अब्रूनुकसानाची दावा ठोकू. इथे तुमची दादागिरी चालणार नाही.'' नितीन नवले म्हणाले,""मी चर्चेतच नव्हतो, तर माझे नाव का घेतले?'' सुहास बाबर म्हणाले, ""काही सदस्यांचा अभ्यास कमी असेल, त्यामुळे ठरावाचा आग्रह झाला असेल, मात्र तो बेकायदा आहे, हे सचिवांनी आणि सीईओंनी निदर्शनास आणून द्यायला हवे होते. हे सर्व कारस्थान होते आणि निवडणुकांच्या तोंडावर आम्हाला बदनाम केले गेले. वीस वर्षे राजकारण करतोय, आम्ही लेचेपेचे नाही, आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करू नका.'' 

अन्‌ महिला पुढे धावल्या 
कामाचा ठेका सदस्यांच्या शिफारशीनुसार द्यावा, या मुद्द्यावर चर्चा घडत असताना गुडेवार यांनी हरिपूरच्या सदस्या शोभा कांबळे यांचा त्याबाबत उल्लेख केला. त्या मुद्द्यावर महिला सदस्या आक्रमक झाल्या आणि त्यांनी पीठासनाकडे धाव घेत गुडेवार यांना जाब विचारला. 

शिस्तभंगाचे दहा मुद्दे 
गुडेवार यांनी शिस्तभंग केल्याचे काही मुद्दे जितेंद्र पाटील यांनी वाचून दाखवले. ते म्हणाले, ""माझ्या शर्टवरून अपमान केला, सीईओंचे अधिकार त्यांनी वापरले. मजूर संस्थांना दमदाटी केली, कर्मचाऱ्यांचा वारंवार अपमान केला, सीएचओंच्या चुकीच्या बदल्या केल्या, कोरोना काळात 144 कलमाचे भंग करून गर्दी केली. हे सारे गंभीर आहे.'' 

शिवाजी डोंगरेंची शिष्टाई 
सभेत वादाचे वादळ घोंगावत असताना उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडली. त्यांनी डुडी, गुडेवार यांच्याशी चर्चा करतानाच सदस्यांच्या मताचा आदर करत "सरकारने गुडेवारांना परत बोलवावे', या मुद्द्यावर त्याचा शेवट केला. 

कोण काय म्हणाले... 

  • प्राजक्ता कोरे, अध्यक्ष ः हा ठराव बेकायदा आहे आणि तो करणे चुकीचे ठरेल, असे मला अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून द्यायला हवे होते. तसे झाले नाही. 
  • राहुल गावडे, सभा सचिव ः ठराव घेण्याबाबत सदस्य आक्रमक होते. त्यामुळे ठराव झाला असे गृहीत धरून तो नोंदवला. अध्यक्षांसमोर तो सहीसाठी ठेवला आणि त्यांनी तो मंजूर केला. 
  • चंद्रकांत गुडेवार, अतिरिक्त सीईओ ः मला पत्रकारांनी त्या बेकायदा ठरावाबद्दल विचारले. मी कायद्यानुसार बरखास्तीचा प्रस्ताव करणार असल्याचे सांगितले. तसा प्रस्तावही पाठवला. मला तो अधिकार आहे. 
  • जितेंद्र डुडी, सीईओ ः गुडेवारांना परत बोलावून घ्या, असा प्रस्ताव पाठवण्याचा मला अधिकार नाही. मी माहिती घेऊन पुढील कार्यवाही करेन. 
  • जितेंद्र पाटील, कॉंग्रेस गटनेते ः चंद्रकांत गुडेवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा. त्यांनी केलेल्या शिस्तभंगाचे दहा मुद्दे माझ्याकडे आहेत, ते मी सीईओंना देईन. 

लाव रे तो "ऑडिओ' 
जितेंद्र पाटील यांनी गेल्या सभेतील त्या वादग्रस्त ठरावावेळच्या चर्चेची ध्वनिफीत मिळवली. ती त्यांनी एका रेकॉर्डरवर वाजवली. सदस्यांनी केलेली मागणी, सभापती प्रमोद शेंडगे यांनी "असा ठराव करता येणार नाही, सीईओसाहेब त्यातून मार्ग काढतील', असे सांगत विषय संपवला होता. मग, ठराव कुठे झाला, असा प्रश्‍न पाटील यांनी उपस्थित केला. या "लाव रे तो ऑडिओ' प्रकाराची सभागृहात चर्चा रंगली. 

म्हैसाळला गेलो असतो तर... 
चंद्रकांत गुडेवार यांनी म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या निकालावरून केलेल्या टिपणीची सभेत चर्चा झाली. सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी सभापती प्रमोद शेंडगे यांच्या दालनात झालेल्या त्या टिपणीचा तपशील सांगितला. म्हैसाळमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांचे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची सत्ता गेली. भाजपची सत्ता आली. त्यावर गुडेवार म्हणाले होते की, मी म्हैसाळमध्ये गेलो असतो, तर राष्ट्रवादीचे तीन सदस्यही निवडून आले नसते.'' या मुद्द्यावर वाळवेकर म्हणाले,""गुडेवारांना राजकारणच करायचे आहे का? त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि राजकारणाच्या मैदानात यावे. भिलवडीबाबत त्यांनी तेच केले.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Send back to Gudewar Chandrakant; Members riot at Sangli ZP meeting