esakal | नगरमध्ये कोरोना बाधित रिपोर्टचा सीलसिला सुरूच, आता झाले १७
sakal

बोलून बातमी शोधा

Seventeen corona patients in Ahmednagar

नवी दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि जिल्ह्यात आलेल्यांपैकी चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या 46पैकी 35 नागरिकांना यापूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. उर्वरित अकरा जणांनाही काल (बुधवारी) रात्रीच रुग्णालयात दाखल केले.

नगरमध्ये कोरोना बाधित रिपोर्टचा सीलसिला सुरूच, आता झाले १७

sakal_logo
By
विनायक लांडे

नगर ः जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात धोका वाढला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाला पुण्यातील प्रयोगशाळेतून आज १११ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यांत आणखी सहा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

रात्री उशिरा आलेल्या अहवालात तीन बाधित वाढले आहेत. दोन संगमनेर आणि एका जामखेडकराचा समावेश आहे. या बाधित व्यक्ती 17 ते 68 वयोगटातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची सख्या आता १७ वर पोचल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. या परदेशी लोकांच्या संपर्कात आलेल्या ६१जणांचे अहवाल येणे बाकी आहे.

प्रशासनाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे बुधवारी (ता. एक) सकाळपर्यंत 112 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांपैकी प्राप्त झालेल्या 51 अहवालांमध्ये सहा जण बाधित निघाले.  रात्री तीन बाधित निघाले. इंडोनेशिया आणि जिबुटी या देशांतील प्रत्येकी एकाचा, संगमनेर तालुक्‍यातील चौघांचा आणि मुकुंदनगर भागात राहणाऱ्या दोन जणांचा समावेश आहे. जामखेडमधील एक बाधित निघाला. मुकुंदनगरमधील दोघे परदेशी व्यक्तींचे भाषांतरकार म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाले. ते मूळचे कोटा (राजस्थान) व भोपाळ (मध्य प्रदेश) येथील आहेत. यातील दोन विदेशी व्यक्तींनी नवी दिल्ली येथील निजामुद्दीन भागात झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर ते संगमनेर, मुकुंदनगर येथील व्यक्तींच्या संपर्कात आले होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरील सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. संगमनेर व मुकुंदनगर परिसरात प्रतिबंधात्मक आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. तेथील नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास मनाई आहे. 
नवी दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि जिल्ह्यात आलेल्यांपैकी चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या 46पैकी 35 नागरिकांना यापूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. उर्वरित अकरा जणांनाही काल (बुधवारी) रात्रीच रुग्णालयात दाखल केले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही होताना दिसत आहे. विदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासन कसून शोध घेत आहे. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात "क्वारंटाईन' केले जात आहे. विदेशी नागरिकांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई, तसेच शहरातील मुकुंदनगरमध्ये आणि जामखेडला वास्तव्य केले होते. 

आणखी 250 बेडची सोय 
आज सापडलेल्या सहा पॉझिटिव्ह रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधील आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात पाठविले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून बडीसाजन मंगल कार्यालय, शासकीय महाविद्यालय या ठिकाणीही 250 बेडची सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात सात व्हेंटिलेटर असून, शासनाकडे आणखी सहा व्हेंटिलेटरचा प्रस्ताव पाठविला आहे. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे. कोरोना प्रतिबंधाच्या लढ्यात नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. 14 एप्रिलपर्यंत "लॉक डाउन' आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार करूनही काहींना अद्याप परिस्थितीचे गांभीर्य जाणवत नसल्याचे दिसते. मात्र, नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 
 

कोरोना मीटर 
437 व्यक्तींची तपासणी 
14 पॉझिटिव्ह 
356 निगेटिव्ह 
61 अहवाल येणे बाकी 
436 "होम क्वारंटाईन' 
158 देखरेखीखाली 
1 रुग्णालयातून "डिस्चार्ज'