सेना मंत्री अन्‌ एसपींचं जमलं

विशाल पाटील
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

मल्हारपेठ येथे पोलिस ठाणे व्हावे, यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्न करत आहे. मी मंत्री झाल्याने आता जिल्ह्यातील दहाही, तसेच राज्यातील प्रस्तावित पोलिस ठाणी मंजूर करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहे. मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन तसा शासन निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणार असून, जिल्ह्यास चांगला वाटा मिळवू, अशी ग्वाही मंत्री देसाईंनी दिली. 

सातारा : पोलिस अधीक्षक तेजस्‍वी सातपुते यांनी राजशिष्‍ठाचार पाळला नसल्‍याची तक्रार हिवाळी अधिवेशनात आमदार शंभूराज देसाई यांनी केली होती. आता अधिवेशनानंतर गृह राज्‍यमंत्री (ग्रामीण) हे देसाईंकडेच आले. त्‍यामुळे आता दोघांत जुंपणार की काय, अशी चर्चा पोलिस दलातही सुरू आहे. मात्र, आज (शुक्रवार) शंभुराज देसाईंची भेट घेण्‍याची कोल्‍हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुहास वारके आले आणि त्‍यांच्‍या बरोबर एसपी सातपुतेही आल्‍या. या दोघांनी प्रशासकीय राजशिष्‍ठाचार पाळला, तर देसाईंनीही आदरातिथ्‍याचा राजशिष्‍ठाचार पाळला.

जरुर वाचा - पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंवर कारवाई ?

विशेष महानिरीक्षक सुहास वारके, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज सकाळी देसाईंची निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्‍याबाबत पत्रकारांशी बोलताना देसाईंनी "त्यांना मी चहा दिला," असे सांगितले. त्यावर तुम्ही एसपींवर दाखल केलेल्या राजशिष्टाचार भंगाचे काय झाले, असा प्रश्‍न विचारला गेला. ""विधिमंडळात मी तक्रार केली असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे. गृहखात्याचा मी मंत्री असल्याने प्रोटोकॉलनुसार ते मला भेटण्यास आले होते,'' असे उत्तरही त्यांनी दिले.
दरम्यान देसाई यांच्या उत्तराने त्यांच्यामध्ये आणि एसपींमध्ये समेट झाल्याची चर्चा रंगली.

नक्की वाचा -  सेना आमदाराच्या तक्रारीवर एसपींचे हे उत्तर

 
मंत्री देसाई यांनी वित्त, राज्य उत्पादन शुल्क, पणन, कौशल्य विकास आदी विभागांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""मार्च महिन्यास दोन महिने राहिले असून, अखर्चित निधी खर्च होण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दोन- तीन विभागांचा अपवाद वगळता इतर विभागांचा निधी मार्गी लागला आहे. आगामी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात निधी वाढवून मिळविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. बाजार समित्या भक्‍कम करण्यासाठी, त्यांना आर्थिक सुबकता देण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मी प्रयत्न करणार आहे. बाजार समित्यांत काय अडचणी आहेत, त्याची कारणे काय हे अभ्यासून त्यात सुधारणार केल्या जातील.'' 
 

पवारांचा कौशल्यावर भर
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यास गेलो. तेव्हा त्यांनी कौशल्य विकासवर विशेष भर देण्यास सांगितले. आयटीआयचे पारंपरिक कोर्स बदलून कंपन्यांना आवश्‍यक ते अभ्यासक्रम सुरू करण्यास सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी सकाळीच माझी भेट घेतली. त्यांच्याबरोबर कौशल्य विकास वाढीसाठी प्रयत्न करता येतील का, यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे श्री. देसाईंनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shambhuraj Desai Offered Tea To Superintendent Of Police Tejaswi Satpute Satara News