लष्कराचा वापर राजकीय स्वार्थासाठी - शरद पवार

लष्कराचा वापर राजकीय स्वार्थासाठी - शरद पवार

कोल्हापूर - देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी लष्कराची, हवाई दलाची असताना त्याचा लाभ राजकीय स्वार्थासाठी आज सरकार व स्वतः पंतप्रधान घेतात ही अत्यंत दुःखद घटना आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली. 

दरम्यान, शहिदांच्या बलिदानाचा वापर सरकारकडून राजकीय स्वार्थासाठी होत आहे. शहीद जवानांबाबत त्यांना सहानुभूती होती तर सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानांसह संरक्षणमंत्री उपस्थित का राहिले नाहीत? असा सवाल करत, राफेल विमान खरेदी व्यवहाराची कागदपत्रेच संरक्षण मंत्रालयातून चोरीला जात असतील तर ही भयानक घटना आहे. या सर्व गोष्टींचा पर्दाफाश कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत करावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी यावेळी केले. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सैन्यदलाच्या पाठीशी उभे राहावे. निवडणुका येतील आणि जातील; पण सैन्याच्या पाठीशी आम्ही आहोत, ही भूमिका जनसामान्यांत रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही ते म्हणाले. 

श्री. पवार यांनी जिल्ह्यातील पक्षाचे बूथ कमिटीप्रमुख, तालुकाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील होते. आपल्या ४० मिनिटांच्या संवादात पवार यांनी गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेली नोटबंदी, त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, राफेल विमान खरेदीचा संशयास्पद व्यवहार, पुलवामा हल्ला, दुष्काळ, कर्जमाफी आदी विषयांवर सरकारचा पंचनामाच केला.  

या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील,  माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हा चिटणीस अनिल साळोखे उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, ‘‘यावेळची निवडणूक आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. त्याचे महत्त्वाचे कारण, आज ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत, त्यांचा पाच वर्षांचा अनुभव बघितल्यानंतर सबंध देशात एक प्रकारची अस्वस्थता पाहायला मिळते. सरकारच्या कारभाराकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. आज देशाच्या संरक्षणासमोर गंभीर प्रश्‍न आहे. सैन्यदलाविषयी अभिमानच असायला हवा. चीनच्या युद्धाचा अपवाद सोडला तर ज्या ज्या वेळी पाकिस्तानविरोधात संघर्ष झाला, त्यात आपण जिंकलो आहोत. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान व यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना पाकिस्तानला एक जबरदस्त किंमत चुकवावी लागली. इंदिरा गांधींच्या हातात सूत्रे होती त्यावेळी पाकिस्तानातून फार मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू होत्या. पुन्हा पुन्हा सांगूनही त्या थांबल्या नाहीत. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी सैन्याला सूचना दिल्या आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली.’’

ते म्हणाले, ‘‘पुलवामा येथे जवानांवर हल्ला झाला ही घटना देशाला धक्का देणारी होती. देशवासीयांच्यात संतप्त भावना होत्या. ज्या दहशतवाद्यांनी हे केले, त्यांना धडा शिकवण्याची भूमिका देशवासीयांच्यात होती. केंद्राने यासंदर्भातील निर्णय घेण्याची सैन्यदलाला मोकळीक दिली. या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरकारने विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावली. सर्व विरोधक या बैठकीला होते. पुलवामा हल्ल्याला ठोस उत्तर द्यावे, हे करत असताना संपूर्ण देश आणि विरोधकही सैन्यदलाच्या पाठीशी राहू, कोणत्याही प्रकारचे राजकारण आणणार नाही, सैन्यदलाची शक्ती वाढवण्यासाठी आम्ही एक असल्याची भूमिका मी मांडली. पण या बैठकीला देशाचे प्रमुख व संरक्षणमंत्रीच उपस्थित राहिले नाहीत ही बाब गंभीर आहे.’’

ते म्हणाले, ‘‘ज्या कारणांसाठी नोटबंदी केली, त्यातून काहीही साध्य झाले नाही. या निर्णयाने शेतकरी देशोधडीला लागला. एकट्या महाराष्ट्रात जानेवारी २०१५ ते मार्च २०१८ या काळात ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ’’

राफेलच्या कागदपत्रांची चोरी भयानकच
राफेल विमानाच्या किंमतीवर वाद आहेत, त्यात ही विमाने सरकारी विमान कंपन्या असताना जी कंपनी अजून अस्तित्वातच नाही, त्याची इमारतही नाही अशा अनिल अंबानींच्या कंपनीला दिली. हे कमी की काय, म्हणून या व्यवहाराची कागदपत्रेच चोरीला गेल्याची माहिती सरकारचे ॲटर्नी जनरल न्यायालयात देत असतील तर ही गोष्ट भयानकच आहे. संरक्षण खात्याच्या कस्टडीतून ती चोरीला जाणे हे तर फारच गंभीर; पण याची माहिती संरक्षण मंत्र्यांनी संसदेत द्यायला हवी होती, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले. 

ना खाऊंगा, ना खाने दुंगा 
निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ घोषणा केली. आता भ्रष्टाचार संपेल असे वाटले, पण राफेलचा व्यवहार पुढे आला, त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. चौकशीची मागणी झाली, पण सरकार चौकशीला तयार नाही. ‘बोफोर्स’ प्रकरणातही चौकशीची मागणी करणारे हेच लोक होते, पण त्या वेळी पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी तत्काळ त्याची चौकशी लावली, मग हे सरकार चौकशीला का घाबरत आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com