
माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात आगमन झाले आहे.
शरद पवार बेळगावात दाखल, उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव - माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात (Belgaum) आगमन झाले आहे. तसेच दोन दिवसांच्या दौर्यात (Tour) पवार हे विविध कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यांचे आगमन झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती.
बेळगावात दाखल झाल्यानंतर पवार यांनी उद्योजक अरविंद गोगटे यांच्या निधनामुळे गोगटे कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन मंगल गोगटे व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील, कर्नाटक विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अमित देसाई, विक्रांत होंनगेकर यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांना चन्नम्मा सर्कलचे चित्र भेट दिले. त्यावेळी पवार यांनी 1986 मध्ये झालेल्या आंदोलनात या ठिकाणी लाठी हल्ला करण्यात आला होता अशी आठवण सांगितली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बुधवारी सकाळी आठ वाजता मराठा बँकेचा अमृत महोत्सव कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात शरद पवार हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. कृष्णा मेनसे असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर ज्योती महाविद्यालय येथे सकाळी १०. ३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ व छत्रपती शाहू प्रकाशन मंडळाच्या साप्ताहिक राष्ट्रवीरच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात पवार हे सहभागी होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सरोज पाटील, उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, सचिव विक्रम पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर पवार यांची चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली असून काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संदर्भात चर्चा करून काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांबाबत कोणती कारवाई करण्यात आली याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Web Title: Sharad Pawar In Belgaum Organizing Various Events Tomorrow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..